कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने भाऊबीज निमित्त प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपयांची विशेष आर्थिक मदत जाहीर केली आहे. या निर्णयासाठी सरकारने एकूण ४०.६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या महिला आणि बालकांच्या पोषण, संगोपन आणि सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान देतात. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून आणि सणाच्या काळात त्यांच्या आनंदात भर टाकण्यासाठी शासनाने ही रक्कम मंजूर केल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या खऱ्या अर्थाने समाजातील ‘शक्ती’ आहेत. त्यांचा सण उत्साहात साजरा व्हावा, हीच आमची इच्छा असल्याचे त्या म्हणाल्या.
राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या योजनेचा लाभ राज्यातील हजारो अंगणवाडी कार्यकर्त्यांना मिळणार आहे. अंगणवाड्यांमधील सेविका आणि मदतनीस या बालकांचे संगोपन, पोषण आणि शिक्षण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या सेवेचा सन्मान म्हणून सरकारने या दिवाळीच्या काळात ही आर्थिक भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, नवी मुंबई येथील आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, यांच्यामार्फत ही भाऊबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यात जमा होणार आहे. या गिफ्टमुळे राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी अधिक गोड आणि आनंदमय होणार आहे. हा निर्णय त्यांच्या कष्टाचं कौतुक करणारा असून, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.