प्रसारमाध्यम : स्पोर्टस डेस्क
भारताच्या बुद्धीबळ इतिहासात एक नवा अध्याय जोडत नागपूरच्या १८ वर्षीय इंटरनॅशनल मास्टर दिव्या देशमुख हिने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषक २०२४ जिंकला. अंतिम फेरीत देशातीलच दिग्गज ग्रँडमास्टर कोनेरू हंपी हिला पराभूत करत दिव्याने हे मानचिन्ह आपल्या नावावर केले. यासह ती हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे
जॉर्जिया देशातील बटुमी शहरात पार पडलेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने इतिहास रचला. तिने अनुभवी आणि उच्च मानांकन असलेल्या कोनेरू हम्पीचा पराभव करत हे प्रतिष्ठेचे विजेतेपद आपल्या नावे केले. असे विजेतेपद पटकवणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. सामन्याच्या मुख्य फेऱ्यांमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. दिव्याने कोणतीही चूक न करता हम्पीला ड्रॉवर रोखले आणि सामना टायब्रेकरपर्यंत नेला. टायब्रेकरमध्ये काळ्या मोहरांवर खेळताना दिव्याने अत्यंत हुशारीने आणि आत्मविश्वासाने खेळ करत निर्णायक विजय मिळवला.
भारतीय लढतीत भारताचा विजय
जॉर्जियामधील बाटुमी येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिव्या आणि हंपी आमनेसामने होते. त्यामुळे, विजय कोणाचाही झाला असता, विश्वचषक भारतातच येणार हे निश्चित होते. शनिवारी (२६ जुलै) झालेला पहिला डाव बरोबरीत सुटला. त्यानंतर दुसऱ्या डावात दिव्यानं पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना दबावाखाली न येता अतिशय आत्मविश्वासाने खेळ करत सामना जिंकला आणि इतिहास घडवला.
झोंगयी, झू जिनर आणि हरिकावर मात
फायनलपूर्वी दिव्याने चीनच्या माजी वर्ल्ड चॅम्पियन झोंगयी टॅन हिला उपांत्य फेरीत पराभूत केले. त्याआधी उपांत्यपूर्व फेरीत तिने भारताचीच आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर हरिका द्रोणावली हिला नमवले होते. याच स्पर्धेत तिने चीनच्या दुसऱ्या मानांकित झू जिनर हिला पराभवाचा धक्का दिला होता.
कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्रता आणि ग्रँडमास्टर नॉर्म
या विजयानंतर दिव्या २०२६ मध्ये होणाऱ्या महिला कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. याशिवाय, तिने आपला पहिला ग्रँडमास्टर नॉर्म देखील मिळवला आहे, जो तिच्या पुढील कारकीर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
दिव्याची प्रतिक्रिया : ही तर फक्त सुरुवात आहे
विजयानंतर आपल्या भावना व्यक्त करताना दिव्यानं म्हटलं, ” मला आता बोलणं कठीण आहे. अजून बरंच काही साध्य करायचं आहे, ही फक्त सुरुवात आहे.” तसंच, उपांत्य फेरीबद्दल बोलताना दिव्यानं स्पष्ट केलं की, ” मी यापेक्षा चांगलं खेळू शकले असते. एका टप्प्यावर मी जिंकत होते, पण परिस्थिती थोडी गुंतागुंतीची झाली. नशीब माझ्या बाजूने होतं.” तणावपूर्ण दिवसांनंतर हसत हसत म्हणाली, “आता मला फक्त झोप आणि जेवण हवं आहे.”
दिव्या देशमुख : एक झपाटलेला प्रवास
दिव्या देशमुख हिचा जन्म ९ डिसेंबर २००५ रोजी नागपूरमध्ये झाला. तिचे वडील डॉ. जितेंद्र आणि आई डॉ. नम्रता देशमुख हे दोघेही वैद्यकीय क्षेत्रात असून दिव्या लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि एकाग्र होती. आई नम्रता देशमुख सांगतात, ” दिव्या फक्त पाच वर्षांची होती, तेव्हापासून बुद्धिबळ खेळते. बॅडमिंटन खेळायला लागली, पण रॅकेट हातात न सावरल्याने तिला जवळच असलेल्या बुद्धिबळ अकॅडमीमध्ये प्रवेश दिला आणि तिथून प्रवास सुरू झाला.”
आंतरराष्ट्रीय यश आणि सन्मान
दिव्या हिने २०१३ मध्ये महिला FIDE मास्टर, २०१८ मध्ये महिला इंटरनॅशनल मास्टर, २०२१ मध्ये महिला ग्रँडमास्टर, आणि २०२३ मध्ये इंटरनॅशनल मास्टर ही पदवी मिळवली. २०२३ मध्ये तिने जगातील नंबर वन महिला ज्युनियर खेळाडूचा किताब पटकावला होता.
दमदार कारकीर्द
-
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये तीन वेळा वैयक्तिक सुवर्ण पदक
-
२०२३ मध्ये आशियाई महिला बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले (अल्माटी)
-
वर्ल्ड युथ आणि वर्ल्ड ज्युनियर स्पर्धांमध्ये पदकं
-
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सातत्यपूर्ण विजय
दिव्या देशमुख हिचा हा विजय केवळ तिच्या वैयक्तिक कारकीर्दीसाठी नव्हे, तर भारतीय महिला बुद्धिबळाच्या उगम आणि उत्क्रांतीसाठी मैलाचा दगड आहे. केवळ १८ वर्षांची असतानाही तिची प्रगल्भता, चिकाटी आणि आत्मविश्वास पाहता, ती भविष्यात जगज्जेती होण्याची पूर्ण शक्यता आहे. भारताला तिच्याकडून अजून कितीतरी अभिमानास्पद क्षण मिळतील, हे निश्चित!
————————————————————————————








