कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे ( ९ सप्टेंबर ) संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गेल्या चार सभांमध्ये सत्ताधारी गटावर सातत्याने कठोर टीका करून शौमिका महाडिक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या प्रश्नांमुळे सत्ताधारी गट बचावाच्या भूमिकेत गेला होता. मात्र, अलीकडेच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत महायुतीचे नाविद मुश्रीफ अध्यक्ष पदावर निवडून आल्याने गोकुळमधील समीकरणे नव्याने जुळवली जात आहेत. या पार्श्वभूमीवर शौमिका महाडिक कोणती भूमिका घेणार, याबाबत जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
बैठकीत शंकांचे निरसन
शनिवारी गोकुळ मुख्यालयात अध्यक्ष नाविद मुश्रीफ, विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे आणि शौमिका महाडिक यांच्यात चर्चा झाली. या बैठकीत महाडिक यांच्या अनेक शंकांचे निरसन झाल्याचे समजते. तसेच, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सल्ला मसलतीनंतर त्यांना व्यासपीठावर स्थान देण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्यांचे समर्थक शिरोली पुलाचे येथे झालेल्या बैठकीत ‘आपण घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य’ असे सांगत पूर्ण पाठिंबा देत असल्याचे वृत्त आहे. या बैठकीस आमदार अशोक माने, माजी संचालक विश्वास जाधव यांसह अनेक प्रभावी कार्यकर्ते उपस्थित होते.
सहकार राजकारणाची नवी दिशा
ही सभा केवळ आर्थिक अहवाल मांडण्यापुरती न राहता जिल्ह्यातील सहकारी राजकारणाची दिशा ठरवणारा टप्पा मानली जात आहे. शौमिका महाडिक कोणती भूमिका घेणार यावर गोकुळचे आगामी धोरण आणि कोल्हापूरच्या सहकार समीकरणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याच्या घडामोडींनुसार त्या व्यासपीठावरच बसतील, अशी चिन्हे असली तरी त्यांच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दूध वितरकांची कमिशन वाढीची मागणी
दरम्यान, रविवारी जिल्हा बँकेत सत्ताधारी गटाची आतल्या घडामोडींवर चर्चा झाली. मुंबईतील गोकुळ दूध वितरकांनी बैठक घेऊन म्हैस दुधासाठी प्रतिलिटर ८० पैसे आणि गाय दुधासाठी दीड रुपयांची कमिशन वाढ करण्याची मागणी केली. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत ही मागणी मांडण्यात आली. या मागणीवर पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे.
मंगळवारी होणारी सभा आर्थिक आढाव्याबरोबरच नेतृत्व आणि सहकार क्षेत्रातील समीकरणे निश्चित करणारी ठरणार आहे. शौमिका महाडिक यांच्या भूमिकेने गोकुळचा पुढील मार्ग ठरवण्याबरोबरच जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
—————————————————————————————————