Nandurbar District Collector Dr. Mittali Sethi has set a unique example by enrolling his own twin sons, Shukar and Sabar, in an Anganwadi.
नंदुरबार : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
नंदुरबार जिल्हा राज्यात कुपोषणग्रस्त म्हणून कुप्रसिद्ध असतानाही जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी स्वतःच्या जुळ्या मुलांना अंगणवाडीत प्रवेश देत अनोखा आदर्श घालून दिला आहे. नंदुरबारपासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर वरील टोकरतलाव येथील जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत शुकर आणि सबर या तीन वर्षांच्या सेठी भावांचा प्रवेश झाला. सोमवारी त्यांचा वाढदिवस असल्याने डॉ. सेठी आणि त्यांचे पती डॉ. वैभव सबनीस यांनी सामाजिक दायित्वाची जाण ठेवत हा निर्णय घेतला.
शहरात दर्जेदार इंग्रजी माध्यम शाळा असताना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या मुलांसाठी अंगणवाडी निवडल्याने सर्वत्र आश्चर्य आणि कौतुकाचा विषय ठरला आहे. अंगणवाडीत मुलांना मिळणारे संगोपन, पोषण व संस्कार यावर विश्वास दाखवत डॉ. सेठी यांनी ” जर माझ्या मुलांच्या प्रवेशामुळे अंगणवाडीतील सेवा अधिक चांगल्या होतील, तर हा प्रयोग संपूर्ण जिल्ह्यात राबवता येईल,” असे मत व्यक्त केले.
टोकरतलावच्या अंगणवाडीत सेविका व मदतनीसांनी खासगी शिंपीकडून नाविन्यपूर्ण झोळी तयार करून लहानग्यांसाठी वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. झोळीत बसवल्यानंतर मुले रडत नाहीत, असा अनुभव पालकांना आला आहे. येथील सेविका आणि मदतनीस मुलांशी प्रेमळ वागतात, हे पाहूनच मुलांना येथे प्रवेशित करण्याची इच्छा झाली, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधून कुपोषण कमी करण्याची जबाबदारी मोठी आहे; मात्र अनेकदा फक्त साहित्य पुरवठ्याच्या ठेक्यापुरतीच यंत्रणा मर्यादित राहिल्याच्या तक्रारी आहेत. अशा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मुलांचाच प्रवेश अंगणवाडीत झाल्याने महिला व बालकल्याण विभागाला दर्जेदार सुविधा पुरवण्याकडे लक्ष द्यावेच लागेल. परिणामी इतर मुलांचेही भले होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या कृतीमुळे पालकांमध्ये अंगणवाड्यांबद्दल विश्वास वाढेल, इंग्रजी माध्यमांच्या मोहाला प्रत्यक्षात पर्याय उपलब्ध आहे, असा संदेश समाजात पोहोचेल, असे स्थानिक नागरिकांचे मत आहे. डॉ. मित्ताली सेठी यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.