मुंबई : विशेष प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या उपस्थितीत रविवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला सर्व जिल्हा प्रमुख उपस्थित होते. यामध्ये आगामी स्थानिक आणि विधानसभेच्या निवडणुकांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. मनसेसोबत युतीबाबतही या बैठकीत चर्चा झाली असून, उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.
उद्धव ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले की, मनसे सोबत युतीबाबत आपण सकारात्मक आहोत, मात्र याबाबत अंतिम निर्णय स्थानिक पातळीवरील आघाडीच्या शक्यतेनुसार घेतला जाईल. त्यांनी सर्व जिल्हा प्रमुखांना आदेश दिले की, आपल्या जिल्ह्यातील स्थानिक राजकीय समीकरणांचा आढावा घ्या आणि मनसेसोबत युती शक्य आहे का याची सविस्तर माहिती पक्षश्रेष्ठींना द्या.
डिनर डिप्लोमसीचा राजकीय डाव
दरम्यान, शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांसाठी डिनर डिप्लोमसीचे आयोजन करण्यात आले असून, ही बैठक हॉटेल ताज लँड्स एंड, मुंबई येथे रात्री ८ वाजता होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीतील पुढील भूमिका, युतीची शक्यता, तसेच निवडणुकीची रणनीती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत कार्यकर्त्यांना बजावले की, “युती झाली तर ठीक, नाही झाली तरी सर्व जागांवर स्वतंत्रपणे लढण्यास तयार रहा.” त्यांनी आगामी राजकारणात कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजप हा भाडोत्री पक्ष आहे, तो अजूनही पक्ष फोडू शकतो.” त्यामुळे सावध राहा आणि संघटना बळकट करा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना बजावले.
या बैठकीत महाविकास आघाडीसोबतच्या समन्वयाबाबतही चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस सोबतही चर्चा करून योग्य त्या ठिकाणी आघाडी किंवा मैत्रीपूर्ण लढाई करता येईल का याचे मूल्यांकन केले जाईल, असे संकेतही या बैठकीत मिळाले.
—————————————————————————————-






