अनिल जासुद : कुरुंदवाड
धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे वारणा धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे धरणाची पाणी पातळी नियत्रिंत करणेसाठी सोमवार पासून धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. सध्या वारणा धरणाच्या वक्र दरवाज्यातून प्रतिसेंकद २८७० क्युसेक व विद्युत गृहातून १६३० असा एकूण ४५०० क्युसेक विसर्ग सुरु आहे.
धरण पाणीपातळीत वाढ होत असल्याने जलाशय परिचलन सुची प्रमाणे पाणी पातळी नियत्रिंत करणेसाठी सोमवार दि.७ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरु असलेला विसर्ग वाढवून तो एकूण १०२६० क्युसेक करण्यात येणार आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी -जास्त झाल्यास तसेच धरणात पाण्यात वाढ किंवा कमी झाल्यास ज्या त्या वेळच्या परिस्थिती नुसार होणारा विसर्ग कमी – जास्त होऊ शकतो.
शिरोळ तालुक्यातील सर्वच नद्या सध्या पात्राबाहेर आहेत. यामध्ये वारणा धरणातून विसर्ग वाढविल्यानतंर वारणेसह कृष्णेच्या ही पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शिरोळ तालुक्यात पावसाच्या अधून मधून होणार्या संततधारा सोडल्या तर गेले दोन – तीन दिवस पावसाची पूर्ण उघडीप आहे.
दरम्यान पावसाच्या उघडीपमुळे तालुक्यात पंचगंगा नदीची पाणी पातळी संथ गतीने ओसरत आहे.यामुळे कृष्णेचाही पुर ओसरु लागेल असे वाटत होते.मात्र वारणा धरणातुन विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने कृष्णेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे.
गेल्या पंधरा – वीस दिवसापासून शिरोळ तालुक्याला पुराचा वेढा कायम राहिला आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजे पर्यंत राजापूर धरणाजवळ पाणी पातळी ३३ फुट ४ इंच आहे. तसेच कोयना धरणात ६७.२० टीएमसी, वारणा धरणात २८.०७ टीएमसी, तर अलमट्टी धरणात ८९.२६८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणांतून प्रतिसेंकद १०५० क्युसेक, वारणा धरणातून ४५०० क्युसेक विसर्ग सुरु आहे. अलमट्टी धरणातून सुरु असलेला एक लाख विसर्ग वाढवून तो प्रति सेंकद १,१५,००० क्युसेक करणेत आला आहे.
—————————————————————————————–