कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि मीडिया स्ट्रीमिंग सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना पाकिस्तान मधून येणाऱ्या कंटेंटवर तात्काळ बंदी घालण्यास सांगण्यात आलं आहे. यात सिनेमे, वेब सिरीज, गाणी, पॉडकास्ट यांचा समावेश असून, कंटेंट मोफत असो वा सशुल्क, आता भारतीय डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्याला थारा मिळणार नाही.
भारत सरकारने देशाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (इंटरमिडियरी गाइडलाईन्स आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोड) रुल्स, २०२१ चा हवाला देत ही सखोल सूचना दिली आहे. हा निर्णय २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घेण्यात आला आहे, ज्यात अनेक भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा संबंध पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांशी असल्याचं समोर आलं.
कोणत्याही प्रकारचा असा कंटेंट प्रकाशित करता कामा नये, जो भारताच्या सार्वभौमत्वाला, एकात्मतेला किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणेल. या सूचनेनंतर सर्व प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म्स, जसे की नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, हॉटस्टार इत्यादींनीही आपली भूमिका ठरवायला सुरुवात केली आहे. सरकारचा स्पष्ट इशारा आहे की, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणताही तडजोड स्वीकारला जाणार नाही.
ऑपरेशन सिंदूर –
भारतीय वायुदलाने ६ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी हवाई कारवाई केली. या कारवाईत कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य न करता फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर मोजकी, नेमकी आणि संतुलित कारवाई करण्यात आली. भारतीय लष्कराच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट करण्यात आलं, “Justice is served. Jai Hind.” या कारवाईनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि बंडी संजय कुमार यांनीही भारतीय सैन्याचं कौतुक केलं आणि पहलगामच्या हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली अर्पण केली.
————————————————————————————