कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता सातबारा, ८ अ, ई-रेकॉर्डसारखी महत्त्वाची भूमी अभिलेख कागदपत्रे थेट आपल्या मोबाईलवर मिळवणे शक्य होणार आहे. भूमी अभिलेख विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नागरिकांसाठी व्हॉट्सअॅपवरून ही सुविधा सुरू केली असून, या माध्यमातून अवघ्या १५ रुपयांत आवश्यक कागदपत्रे मिळवता येणार आहेत.
या नव्या सुविधेमुळे नागरिकांना आता सेतू केंद्रे किंवा महा-ई सेवा केंद्रांवर जाऊन जादा पैसे मोजण्याची गरज राहणार नाही. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना १५ रुपयांच्या अधिक शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र, आता महाभूमी संकेतस्थळावरून थेट व्हॉट्सअॅपद्वारे नोंदणी करून ही सेवा घेता येणार आहे.
या उपक्रमामुळे सेवा पारदर्शक, जलद आणि नागरिकांसाठी अधिक सुलभ झाली आहे. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांसाठी प्रशासन अधिक जवळ जाण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
सेवा कशी मिळवावी ?
-
महाभूमी संकेतस्थळावर जाऊन आपला मोबाईल नंबर नोंदवा
-
व्हॉट्सअॅपवरून आवश्यक कागदपत्र निवडा
-
१५ रुपये ऑनलाइन भरून कागदपत्र मोबाईलवर मिळवा
राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही एक क्रांतिकारी सुविधा ठरणार आहे, जी वेळ, पैसा आणि श्रमांची मोठी बचत करून देईल. त्यातही हा उतारा किंवा दाखला संबंधिताच्या संगणकावर डाऊनलोड होतो. त्यानंतर पेनड्राईव्हमधून तो शेतकऱ्याला घ्यावा लागतो. यात या उताऱ्याचा गैरवापर होण्याची भीती असते. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ही सुविधा व्हॉट्सअॅपवरून देण्याचे ठरवले आहे.
मोबाईलवर सातबारा
महाभूमी संकेतस्थळावर मोबाईल क्रमांक टाकल्यास १५ रुपयांत सातबारा आणि ८ अ उतारा थेट व्हॉट्सअॅप क्रमांकावर मिळेल. उताऱ्याची सुरक्षितता कायम राहून गैरवापरही थांबेल. यासह मिळकत पत्रिका ई-रेकॉर्डमधील दाखलेही मिळणार आहेत. त्यात उत्पन्नाचा दाखला, रहिवास प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखला, जात प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, भूमी अभिलेख आदी दाखल्यांचा समावेश आहे.
तीन स्तरांवर सेवा
भूमी अभिलेख विभागाची ही सेवा तीन स्तरांवर देण्यात येणार आहे. त्यात माहिती, सुविधा आणि सूचना यांचा समावेश आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाभूमी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. त्यात त्याच्या जमिनीशी संबंधित असलेल्या अधिकार अभिलेखाची नोंद आवश्यक असेल. अर्थात जमीन मालक असल्याचा पुरावा असणे आवश्यक असेल, नोंदणीसाठी ५० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना ही सेवा उपलब्ध होईल.
जमिनीच्या नोंदीत बदल झाल्यास, संबंधित मालकाला त्याची सूचना थेट व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. यामध्ये जमिनीची मोजणी, फेरफार, नकाशा बदल आदी संबंधीच्या नोटीसांचा समावेश असून, नागरिकांना वेळेवर महत्त्वाची माहिती मिळेल.
————————————————————————————-



