कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
एखादं पत्र किंवा पार्सल न चुकता तुमच्या पत्त्यावर पोहोचण्यासाठी लागतो… पिनकोड.. त्याशिवाय पत्ता पूर्ण होत नाही. पण टपाल विभागाने आता डिजिटल युगातला नवा पिनकोड लाँच केलाय. त्याचं नाव आहे डिजिपिन.
डिजीपिन म्हणजे काय ?
डिजिपिन हा एक डिजिटल कोड आहे, जो घराच्या किंवा जागेच्या अचूक जीपीएस स्थानावर आधारित असतो. याचा उपयोग पोस्ट, डिलिव्हरी, ई-गव्हर्नन्स सेवा, आपत्कालीन सेवा, अशा अनेक गोष्टींसाठी केला जाऊ शकतो. यामध्ये भारतातील पारंपरिक पिनकोड प्रणालीपेक्षा अधिक अचूकता असते. उदाहरणार्थ, एकाच पिनकोड क्षेत्रात अनेक इमारती किंवा गावे असू शकतात, पण डिजिपिन प्रत्येक ठिकाणासाठी वेगळा असतो. एखाद्या ठिकाणच्या अक्षांश-रेखांशांशी याचा संबंध आहे. यामध्ये भारताच्या सगळ्या भूभागाची ४ बाय ४ मीटरच्या ग्रीडमध्ये – चौकानात विभागणी करण्यात आली आहे. या प्रत्येक ग्रीडला एक १० कॅरेक्टर्स असणारा अल्फा- न्युमरिक म्हणजे अक्षरं आणि आकडे असणारा कोड देण्यात आला आहे. हा कोड अक्षांश-रेखांशांवर आधारित आहे.
डिजिपिनमुळे एखाद्या डिलीव्हरीसाठी नेमक्या ठिकाणी पोहोचणं सोपं जाईल. शिवाय, जिथे पत्ता नेमका नाही वा दुर्गम, डोंगराळ, ग्रामीण भाग आहे, अशा ठिकाणी पोहोचणं, यामुळे थोडं सुलभ होईल. डिजिपिन नेव्हिगेशन सिस्टीम्स आणि अॅप्समध्येही वापरता येईल. डिजिपिन ऑफलाईनही वापरता येणार असल्याचं पोस्टाने म्हटलं आहे. डिजिपिन जनरेट करताना कोणताही खासगी – वैयक्तिक डेटा स्टोअर केला जाणार नाही आणि भौगोलिक तपशीलांवरून कोड जनरेट केला जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलंय.
डिजिपिन आताच्या पिनकोडची जागा घेणार नाही, तुमचा पत्ता बदलणार नाही. तर तुमच्या पत्त्यामधली ही एक अॅडिशन असेल. म्हणजे पत्ता – पिनकोड सोबत डिजीपिनही लिहीलात, तर तुमचं पत्र, पार्सल, डिलीव्हरी घेऊन येणारी व्यक्ती अधिक अचूकपणे आणि लवकर पोहोचू शकेल.
——————————————————————————————