मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्राचे प्रशासकीय केंद्र असलेल्या मंत्रालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांना आता केवळ डिजिटल प्रवेश पत्राद्वारेच प्रवेश मिळणार आहे. ‘डिजी प्रवेश’ या ऑनलाईन ॲप-आधारित प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश पास घेऊनच आत जाता येईल. येत्या १५ ऑगस्टपासून ही नवी कार्यपद्धती अमलात येणार असून, ११ ऑगस्ट रोजी गृह विभागाने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. यामुळे यापूर्वी कार्यरत असलेली मॅन्युअली पास देण्याची पद्धत बंद होणार आहे.
प्रवेशासाठी अभ्यागतांना आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड यांसारखी शासनमान्य ओळखपत्रे सादर करावी लागतील. स्मार्टफोन किंवा डिजिटल साधन नसलेल्या व अशिक्षित अभ्यागतांसाठी गार्डन गेट येथे ‘वन विंडो’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे ऑनलाईन नोंदणी आणि तांत्रिक मदत मिळणार आहे.
‘डिजीप्रवेश’ ॲप अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्रणालींवर विनामूल्य उपलब्ध आहे. ॲपवर एकदाच नोंदणी करावी लागते. नोंदणी दरम्यान आधार क्रमांकावर आधारित छायाचित्र पडताळणी केली जाते. त्यानंतर संबंधित विभागाचा स्लॉट बुक करून रांगे शिवाय प्रवेश घेता येईल. ही प्रक्रिया तीन मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्ण होते.
मात्र, या नव्या नियमावर टीका देखील झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहबुब शेख यांनी सरकारवर हुकूमशाहीचा आरोप केला आहे. “ ग्रामीण भागातील सर्वांकडे स्मार्टफोन, इंटरनेट किंवा अॅप वापरण्याची सुविधा नाही, मग त्या लोकांसाठी मंत्रालयाचे दरवाजे कायमचे बंद का ? लोकशाहीत जनता आणि सरकार यांच्यातील दरवाजे उघडे असायला हवेत, पण हे सरकार डिजिटल कुलूप लावत आहे,” अशी टीका त्यांनी केली. तंत्रज्ञान सोयीसाठी असते, अडथळा निर्माण करण्यासाठी नाही, असेही शेख यांनी स्पष्ट केले.
————————————————————————————————-