कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
लाखो वारकरी शिस्तीने पंढरपूर जातात. कुठेही गोंधळ होत नाही. वर्षानुवर्ष चालणारी ही चोख व्यवस्था म्हणजे एक अभ्यासाचा विषय आहे. वारीची व्यवस्था संतांना समोर ठेऊन केली जाते. पालख्यांची व्यवस्था त्या त्या पालखीतील प्रमुख करतात. संत एकनाथ, संत तुकाराम महारांजांच्या वंशजाकडून त्यांच्या पालखीची व्यवस्था पहिली जाते. ज्ञानेश्वर महाराज पालखीची व्यवस्था ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडून पाहिली जाते. या वारीचे कुटुंबप्रमुख छत्री ज्याच्या डोक्यावर ते असतात. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या डोक्यावर छत्र असते. तेच प्रमुख असतात. तसेच विणा ज्याच्या गळ्यात असते, ते विणेकरी भजनाचे नेतृत्व करतात. वारीसंदर्भात शासनाशी चर्चा करण्यासाठी विविध पदे तयार केली गेली आहे. ते शासनाच्या संपर्कात असतात. वारीत आलेल्या शेकडो दिंड्यांचे व्यवस्थापन त्या दिंडीच्या प्रमुखांकडून केले जाते.
वारीत लाखो लोक शिस्तीने चालत असतात. त्यासाठी वारकऱ्यांची पाच, पाचची रांगा असते. वारकरी कधी दिंडी ओलांडत नाहीत. ते पताकाच्या समोरुन जातात. अगदी शिस्तीने भजन करत, नृत्य करत त्यांची वाटचाल पंढरपूरच्या दिशेने होते. त्यांच्या जेवणाच्या वेळा, बसण्याच्या वेळा, तंबू लावण्याचा वेळा ठरलेल्या असतात.
निरोपाची पद्धत
वारीत निघाल्यावर २० ते २५ दिवस व्यक्ती घरी येत नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्या मंडळींना काही निरोप द्यायचा असेल तर एक चांगली प्रथा होती. आता प्रत्येकाजवळ मोबाईल असल्यामुळे ती प्रथा मोडीत निघाली. पण पूर्वी कोणाचा काही निरोप आल्यावर त्या व्यक्तीचे नाव आणि दिंडी नंबर टाकला जात होतो. तो निरोपाचा कागद पोतदाराकडे दिला जात होता. पोतदार तो निरोप दिंडी प्रमुखाकडे घेऊन जात होता. दिंडी प्रमुख त्या व्यक्तीपर्यंत निरोप पोहचवत होता. पूर्वी पत्र लिहिण्याची सेवा करण्यासाठी सुशक्षित मुले असायची. ती वारकऱ्यांना पत्र लिहून देत होती. पण आता मोबाईल फोनमुळे सर्वच बदलले आहे.
वारीमध्ये महिलांचे स्थान
वारीत पुरुष, महिला असा कधी भेद नाही. महिलांना मानाचे स्थान आहे. वारकरी संप्रदायात नामदेव महाराज यांच्यानंतर जनाबाई यांनी फळ प्रमुख म्हणून काम केले. मुक्ताई यांची पालखी निघते. पहिल्या महिला लेखिका म्हणून मुक्ताईबाईचा उल्लेख करावा लागले, असे असे संत साहित्याचे अभ्यासक सचिन महाराज पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, “मुक्ताबाई त्या काळात स्वत:च्या नावाने अभंग लिहीत होत्या. त्यांच्या साडेतीनशे वर्षांनी विदेशात कांदबरी एका महिलेने लिहिली. परंतु त्या कादंबरीला लेखक म्हणून पुरुषाचे नाव दिले होते. आपल्याकडे कीर्तन करणाऱ्या वारकरी महिला आहेत. वारकऱ्यांच्या मनामध्ये महिलांसंदर्भात कोणतीही वेगळी भूमिका नाही. वारीत जाणाऱ्या सर्वांना माऊली म्हटले जाते. वारीमध्ये महिला म्हणून कधी कोणाला नाकारला जात नाही”.
वारीचा हा सुंदर सोहळा,
पंढरीची वाट निराळी।
पंढरपुरात एक विठ्ठलाची मूर्ती आहे. त्या पांडूरंगच्या दिशेने राज्यभरातील सर्व जाती-धर्माचे लोक लाखोंच्या संख्येने चालत जातात. वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात अन् हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. वारीमुळे द्वेष, अहंकार बाजूला सरला जात आहे. अंतकरण शुद्ध होते. वारीचा हा सुंदर सोहळा महाराष्ट्राशिवाय जगात कुठेच नाही. म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तीने वारी करायलाच हवी…