मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘ महाराष्ट्राचा नायक ’ या कॉफी टेबल बुक चे प्रकाशन करण्यात आले. या विशेष पुस्तकाच्या निमित्ताने फडणवीस यांच्या कार्यशैलीचे आणि नेतृत्वगुणांचे सर्वपक्षीय नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात आले आहे.
या पुस्तकात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर विशेष भाष्य करत म्हटलं की, “देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार राजकारणी असून भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या आव्हानांवर त्यांनी आपल्या अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने यशस्वीरित्या मात करत विश्वासार्हता निर्माण केली आहे.”
उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची प्रतिमा ” गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ ” अशा शब्दांत वर्णन करत त्यांच्या राजकीय प्रवासाचा गौरव केला.
या पुस्तकाच्या पुढाकारामध्ये राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे महत्त्वाचे योगदान असून, त्यांनी फडणवीसांच्या राजकीय कार्याचा दस्तऐवज तयार करण्यासाठी ‘महाराष्ट्राचा नायक’ संकल्पना प्रत्यक्षात आणली.
केवळ उद्धव ठाकरेच नव्हे, तर ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह अनेक महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनीही फडणवीस यांच्या कार्यशैलीचे व नेतृत्वगुणांचे कौतुक केले आहे.
या पुस्तकात त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात राबवले गेलेले विविध प्रकल्प, धोरणात्मक निर्णय आणि प्रशासनिक कौशल्याचा विस्ताराने ऊहापोह करण्यात आला आहे.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांकडून मिळणारी अशी प्रशंसा हे फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या स्वीकारार्हतेचे प्रतिक मानले जात आहे. ‘ महाराष्ट्राचा नायक ’ हे पुस्तक केवळ एका नेत्या विषयीचे गौरव वचन न राहता, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा संदर्भ ठरणार आहे.
——————————————————————————–






