भाजपच्या केंद्रीय अध्यक्षपदाबाबत हालचालींना वेग आला असून, या पदासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांचा गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मोदी सरकार मधील या दोन मोठ्या नावांचा गंभीरपणे विचार करण्यात येत आहे.
भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होत आहे. त्यानंतर पक्षाला नवा अध्यक्ष देण्यासाठी प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विश्वासाला पात्र असणारा आणि संघाचा पाठिंबा लाभलेला नेता या पदावर बसण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बिहार विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. त्यानंतर त्यांची भाजप अध्यक्षपदासाठी निवड होण्याची शक्यता आहे. पक्षातील सूत्रांनी म्हटलं आहे की, “ संदेश देण्यात आला आहे, मात्र फडणवीस यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत चर्चा सुरू आहे. ते तरुण नेते असून, संघाचा पाठिंबा आणि पक्ष नेतृत्वाचा विश्वास त्यांना आहे.”
दरम्यान, या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
निवडणुका कधी होणार ?
भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत पक्षाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, बिहार निवडणुकीनंतर यावर निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे. संभाव्य उमेदवारांची यादी पक्षाकडून तयार करण्यात आल्याचे वृत्त असून, त्याचा अंतिम विचार उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर केला जाईल.
दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीनंतरच भाजपकडून अध्यक्षपदाच्या प्रक्रियेला वेग येईल, असे मानले जात आहे.