कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
खमंग सुटलेला वास… कढईत खरपूस तळत असलेले बटाटेवडे…वडे चांगले भाजण्यासाठी मालवाला कढईत झारीने करत असलेली कच्च्या वड्यांची उलथापालथ…! हे पाहत असताना कुणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही बरे! बटाटावडा हा महाराष्ट्रात कुठेही अगदी केव्हाही मिळणारा आणि विशेष म्हणजे सर्वांच्या आवडीचा पदार्थ. बटाटावड्याच्या खमंग वासाची आज आठवण यायचे कारण म्हणजे आज २३ ऑगस्ट असून आजचा दिवस जागतिक वडापाव दिन म्हणून साजरा केला जातो.
बटाटावडा कमी वेळेत तयार होणारा चटपटीत पदार्थ आहे. वड्यातील बटाटे, बेसन, पाव या घटक पदार्थामुळे भूक कांही वेळ तग धरते. खायला खमंग आणि भूकही भागविणारा बटाटावडा असल्यामुळे फार कमी कालावधीत लोकप्रिय झाला आहे.
अशोक वैद्य नावाच्या व्यक्तीने १९६६ च्या सुमारास मुंबईच्या दादर स्टेशनबाहेर पहिल्यांदा वडापाव विकायला सुरुवात केली. त्याची संकल्पना म्हणजे कामावर जाणाऱ्या माणसाला पटकन आणि स्वस्तात मिळणारा खाऊ उपलब्ध करून देणे. ही कल्पना इतकी लोकप्रिय झाली की आज वडापाव मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक भावनिक आणि खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आहे.