विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या स्टाफला शिंदेंच्या स्टाफचे दालन ; नाराजीचा सूर
मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली, मात्र पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयीन स्टाफला कार्यालय न मिळाल्याने गोंधळ उडाला. विशेष म्हणजे, शिंदे यांच्या स्टाफ साठी असलेले दालन विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या स्टाफला देण्यात आले. मात्र, शिंदे यांच्या स्टाफसाठी नव्याने कोणतीही व्यवस्था न केल्याने शिंदे यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाराजी व्यक्त केली.
विधानभवनाच्या तळमजल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकृत ३२ क्रमांकाचे दालन आहे. याच्या शेजारी असलेले दालन क्रमांक ३० शिंदे यांच्या स्टाफसाठी होते. मात्र यंदा ते दालन बनसोडे यांच्या स्टाफला दिले. याशिवाय विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पूर्वीचे दालन क्रमांक ४२ देखील आता विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आले आहे. तर दानवे यांना पहिल्या मजल्यावर दालन देण्यात आले आहे. उपाध्यक्ष यांचे दालन आणि त्यांच्या स्टाफ चे दालन समोरासमोर असल्याने ही व्यवस्था करण्यात आली आहे.
मात्र ही अदलाबदल करताना शिंदे यांच्या स्टाफला कार्यालय देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिंदे यांच्या सुमारे २० जणांच्या स्टाफला, शिंदे यांच्या मुख्य दालनातील कॉन्फरन्स रूममधून कामकाज करावे लागले. शिंदे यांच्या स्टाफला अद्याप पर्यायी कार्यालय दिले गेलेले नसल्याने पहिल्याच दिवशी त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागल्याने त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
—————————————————————————————-