कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्या दरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र या दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसंदर्भातील रणनीतीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासोबतच मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुढील राजकीय हालचालींचा आराखडा तयार केला जाऊ शकतो.
भाजप आणि शिंदे गट यांच्यातील युती अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनेही ही भेट महत्त्वाची ठरणार आहे, असे राजकीय वर्तुळांमध्ये बोलले जात आहे. दिल्ली दौऱ्याचे नेमके स्वरूप काय असेल, हे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आलेले नसले तरी, या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दौऱ्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, योगेश कदम यांच्याशी मंत्रालयाच्या दालनात बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती मिळू शकली नाही.
———————————————————————————————–






