मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या काल रात्रीच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड चर्चांना उधाण आले आहे. हा दौरा केवळ सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपुरता मर्यादित नसून, पक्षबांधणी, राष्ट्रीय विस्तार, तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीची रणनीती ठरवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.
राष्ट्रीय विस्तारासाठी पक्षबांधणीची सुरुवात
अलीकडेच पार पडलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर, पक्षाचा राष्ट्रीय विस्तार अधिक गतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यात विविध राज्यांतील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला. शिवसेनेला केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता राष्ट्रीय राजकारणात आपले अस्तित्व निर्माण करण्याची योजना या दौऱ्यात स्पष्ट करण्यात आली. राष्ट्रीय पातळीवर पक्षाची मांडणी कशी असावी, त्यासाठी कोणत्या राज्यांमध्ये प्रभाव वाढवायचा, यासंबंधी रणनीती ठरवण्यात आली.
भाजप नेत्यांसोबत बंद दाराआड चर्चा
शिंदे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली. या भेटीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील राजकीय गणितांवर चर्चा झाल्याचे समजते. मराठी आणि हिंदी भाषिक मतांचे विभाजन, कोकण-ठाणे भागातील उमेदवाराचे समीकरण आणि युतीच्या पुढील वाटचालीचा तपशील यावर भर दिला गेला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक ही भाजप-शिंदे युतीसाठी संभाव्य डोकेदुखी ठरू शकते. विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक आणि कोकणातील मराठी मतदारांचा कल दोघांकडे वळल्यास, त्याचा फटका महायुतीला बसू शकतो. या मतविभाजनामुळे किती जागांवर परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास भाजप आणि शिंदे गटाच्या बैठकीत करण्यात आला.
शिंदे-राज युतीची शक्यता ?
या पार्श्वभूमीवर शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य जवळीक चर्चेचा भाग ठरली आहे. आगामी निवडणुकांमध्ये मनसे सोबत युती करून मराठी मतांवर पकड मजबूत करण्याचा पर्याय देखील चर्चेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. भाजप देखील या समीकरणाकडे सकारात्मक असल्याचे काही संकेत मिळाले आहेत.
एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा म्हणजे एकाच वेळी कायदेशीर तयारी, पक्षाचा राष्ट्रीय विस्तार आणि राजकीय समीकरणांवरील मंथन यांचा त्रिवेणी संगम होता. ठाकरे बंधूंच्या जवळकीने निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिंदे गट आणि भाजप नव्याने रणनीती आखत आहेत. येत्या काळात महाराष्ट्रातील राजकारण अधिक धगधगतं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
——————————————————————————-