मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्य सरकारने पोलीस दलातील अंमलदारांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठीची खाते अंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये २५ टक्के आरक्षण लागू करण्यात आलं असून, मेहनती व अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये परीक्षा बंद
फेब्रुवारी २०२२ मध्ये विभागीय परीक्षा बंद करण्यात आली होती. या निर्णयामुळे हजारो पोलीस कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर उमटला होता. कारण, अनेक जण वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करत अधिकारी पदावर जाण्याची स्वप्नं पाहत होते. मात्र परीक्षाच बंद झाल्यामुळे त्यांची कारकीर्द अडखळली होती.
शासनाचा नव्याने निर्णय
नव्या निर्णयामुळे आता ही परीक्षा पुन्हा सुरू झाली आहे. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की या परीक्षेतून निवड होणाऱ्या उमेदवारांसाठी २५ टक्के आरक्षण लागू असेल. यामुळे अधिक पात्र, सेवाभिमानी व अनुभवी पोलीस अंमलदारांना न्याय मिळणार आहे.
पोलीस सेवेत अनेक वेळा अंमलदारांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करावं लागतं. गुन्हेगारी रोखण्यापासून ते जनतेच्या सुरक्षेपर्यंत सर्व जबाबदाऱ्या पेलताना त्यांना दिवस-रात्र झटावं लागतं. अशा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदांवर संधी मिळाल्यास त्यांच्या मनोबलात वाढ होईलच, शिवाय पोलीस दलाची कार्यक्षमताही दुणावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह
या निर्णयाची माहिती मिळताच राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. “सरकारने आमचं स्वप्न पुन्हा जिवंत केलं” अशा भावना पोलीस दलातून व्यक्त केल्या जात आहेत.
शासनाच्या या निर्णयामुळे सेवेत कर्तव्यदक्षता दाखवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकारी बनण्याची खरी संधी मिळणार आहे. यामुळे “मेहनतीला योग्य न्याय” मिळत असल्याचं समाधान कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
———————————————————————————————-