कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शरीराला गारवा देणारे आणि थकवा दूर करणारे आणखी एक सर्वांच्या आवडीचे फळ म्हणजे अननस होय. हे फळ उन्हाळ्यात बाजारात येत असल्याने याचे आणखी महत्त्व वाढते. अननस पाणीदार फळ असले तरी या पिकाला पाणी फारसे लागत नाही. अननसचे मूळ जरी दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, पराग्वे असले तरी आपल्या भागात सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक या जिल्ह्यात अननसचे चांगले उत्पादन होते. महाराष्ट्र भारतात अननस उत्पादनामध्ये मध्यम स्थानावर आहे, पण कोकण व काही भागात या फळाचे व्यावसायिक उत्पादन होते.
अननसाची लागवड जून ते जुलै दरम्यान (पावसाळ्याच्या सुरुवातीस) केली जाते. सिंचनाची सोय असल्यास फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यानही लागवड केली जाऊ शकते. अननस ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या पिकास उष्ण आणि दमट हवामान योग्य (२५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान) आहे. वालुकामय ते मध्यम काळी जमीन; चांगला निचरा असलेली माती या पिकाला आवश्यक असते. या पिकाला मध्यम स्वरूपात पाणी लागते. अधिक पाणी दिल्यास मुळे कुजतात.
अननस पिक पक्व होण्यास १२ ते १८ महिने लागतात. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात लागवड केल्यास पुढील उन्हाळ्यात पिक तयार होते. अननस गोड आणि विशिष्ट स्वाद असल्याले पाणीदार फळ आहे. भर उन्हाळ्यात हे पिक पक्व होते. अननसमध्ये पोषण मुल्ये अधिक आहेत. यामुळे या पिकाला अधिक मागणी आहे.
अननसमधील पोषण मुल्ये अशी – कॅलरी/उष्मांक : सुमारे ५०, पाणी: ८५–८८ टक्के, कार्बोहायड्रेट्स: १३ ग्रॅम, फायबर्स: १.४, ग्रॅम, व्हिटॅमिन क : ७९ मिग्रॅम, अॅन्टीऑक्सिडंट्स: ब्रोमेलेन (Bromelain) नावाचा एन्झाइम जो पचनास मदत करतो.
अननसचे औषधी उपयोग : अन्नपचन सुधारते, दाह कमी करण्यास मदत, सर्दी, खोकला यामध्ये उपयोगी, त्वचेच्या जखमा भरून येण्यासाठी उपयोग, शरीरातील सूज कमी करण्यास मदत होते.
अननसचा औद्योगिक वापर : फळप्रक्रिया उद्योगात (ज्यूस, कॅन्ड फळ, जॅम), ब्रूमेलिनचा उपयोग औषधनिर्मितीत, सुकवलेले अननस तुकडे स्नॅक्स म्हणून उपयोग होतो.
दक्षता : जास्त प्रमाणात खाल्ल्यास तोंडात जळजळ होऊ शकते, अॅसिडिक असल्यामुळे अॅसिडिटी असणाऱ्यांनी प्रमाणात खावे, कच्चे अननस गर्भवती महिलांनी टाळावे (ब्रोमेलेन गर्भाशय आकुंचन वाढवू शकतो)