कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सहा वर्षापर्यंतच्या मुलांनी एक सेकंदही मोबाईल पाहु नये. त्यानंतर २१ वर्षापर्यंत दिवसातून फक्त ३६ ते ५६ मिनिटे मोबाईल पहावा. मोबाईल्मुळे झोपेवर विपरीत परिणाम होतो… डोळ्यांच्या आजाराविषयी अशा विविध प्रश्नाची उत्तरे ते देत होते शिवाय गरजुना अल्प खर्चात किवा मोफत शस्त्रक्रिया करून देण्याचे आश्वासनही देत होते. डोळ्याच्या आजारावर सल्लाही आत्मतिडकेने देत होते. निमित्त होते, डॉक्टर दिनाचे! पद्मश्री पुरस्कारप्राप्त जगप्रसिद्ध नेत्र उपचार तज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांचे. दै. पुढारी व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या वतीने येथील शाहू स्मारक भावनमध्ये ‘डोळे आणि आरोग्य’ या विषयावर व्याख्यान झाले. या व्याख्यानानंतर डॉ.लहाने श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत मार्गदर्शनही करत होते.
लातूर जिल्ह्यातील गरीब शेतकरी कुटुंबातून डॉ. तात्याराव लहाने आले. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांची किडनी खराब झाली. त्यांच्या आईने डॉ. लहानेना किडनी दिली. हे आपले अधिकचे आयुष्य आहे असे मानून डॉ. लहानेनी मनोभावे रुग्णसेवा सुरु केली.
तात्याराव लहाने जगप्रसिद्ध डोळे उपचार तज्ञ. त्यांनी दोन लाखाच्या जवळपास मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या, ५० लाखांहून अधिक नेत्र रूग्णावर उपचार केले. विशेषतः लेप्रोसी रुग्णांसाठी १२०० हून अधिक मोतिबिंदू शिबिरे घेतली. ग्रामीण-आदिवासी भागात सतत मोतिबिंदू शिबिरे, कराटोप्लास्टी, बाळांच्या डोळ्यांवरील शस्त्रक्रिया आणि लेसर उपचार केले.
डॉक्टर दिनानिमित्त काल त्यांचे डोळ्यांच्या आजारावर कोल्हापुरात व्याख्यान झाले. या व्याख्य्नासाठी श्रोत्यांनी खूप गर्दी केली होती. व्याख्यान झाल्यानंतर श्रोत्यांना डोळ्यांच्या आजाराविषयी काही शंका असतील तर विचारण्याचे आवाहन डॉ. लहाने यांनी केले. जवळपास ७० श्रोत्यांनी शंका विचारल्या. डोळ्यामध्ये मोतीबिंदूची जाळी तयार होत असता केवळ डोळ्याचे व्यायाम केल्याने दृष्टी सुधारू शकते का, मला वाचनाची आवड आहे पण वाचताना कधीतरी डोळ्यावर अंधारी येते. त्याचे कारण व उपाय सांगा., दोन्ही डोळ्यांना खाज सुटते व दोन्ही डोळ्यांचा सफेद भाग लालसर झाला आहे. , नंबर घालवण्याची सर्जरी करू का, माझे डोळ्याचे ऑपरेशन होऊन ६ महिने झाले. डोळ्यातून राहून राहून पाणी येते. काचबिंदू झाला आहे का उपाय काय करावा, मोतीबिंदू झाल्यावर शस्त्रक्रिया किती दिवसात करावी, सध्या माझ्या चष्म्याचा नंबर प्लस तीन आहे. तो कमी करण्यासाठी उपाय काय, मोतीबिंदू होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, शाळेत स्क्रीनवर शिक्षण योग्य आहे का, असे प्रश्न यावेळी विचारण्यात आले. या प्रश्नांची अगदी आत्मीयतेने डॉ. लहाने यांनी उत्तरे दिली.
डॉ. लहाने सांगत होते, झोप शरीराची झीज भरून काढते. म्हणून दररोज झोप पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपण झोपताना मोबाईल बघत असू ते पूर्णपणे चुकीचे आहे. झोपताना, लाईट बंद असताना मोबाईल पाहताना डोळ्याची बाहुली लहान होते. यामुळे झोप जाते. परत झोप येण्यासाठी बाहुली मोठी होण्यासाठी दोन तास जातात. म्हणूनच झोपण्याआधी दोन तास मोबाईल व एक तास आधी टीव्ही पाहू नये. मोबाईल अति वापरामुळे शरीराचे व देशाचे खूप नुकसान होणार आहे, पण हा वणवा पेटला आहे तो लगेच बंद होणार नाही. कोरफड डोळ्याला लाऊ नये. त्याचे अतिशय विपरीत परिणाम होतात. डॉ. लहाने यांनी अशा सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रम संपल्यानंतरही शाहू स्मारकमधून बाहेर पडेपर्यंत त्यांना अनेकजण भेटत होते. प्रश्न विचारत होते. डॉ. लहाने उत्तर देत होते. दोन बाल पेशंटना घेऊन पालक आले होते. त्या पेशंटना पाहून व आर्थिक परिस्थिती विचारून त्यांनी मुंबईत हॉस्पिटलमध्ये या अत्यल्प खर्चात उपचार करतो असे सांगितले.
हा कार्यक्रम पाहताना आणि डॉक्टर लहाने यांची रूग्णाप्रती बांधिलकी पाहताना, होय! हेच खरे पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉक्टर, हे यावेळी जाणवले.
————————————————————————-



