कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
पहिलीपासून हिंदी भाषा शिकविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तथापी या निर्णयाला तीव्र विरोध झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय रद्द केला. त्यानंतर आता तिसरी ते दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमातून तिसरी भाषा हद्दपार करण्यात आली आहे. तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश केला जाणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, नव्या मसुद्यातून हिंदी वगळण्यात आली आहे. त्यानंतर आता एससीईआरटीकडून सुधारीत अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला असून त्रिभाषा सुत्र समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते दहावीसाठी शालेय शिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम मसुदा तयार केला आहे. यामध्ये इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीची करणाऱ्या शालेय शिक्षण विभागाने आता आपल्या भूमिकेपासून फारकत घेऊन इयत्ता तिसरी ते दहावीच्या प्रस्तावित अभ्यासक्रमातूनही तिसरी भाषा हद्दपार केली आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र; तसेच कलाशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि पायाभूत मूल्य शिक्षणाचे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेला हा ‘अभ्यासक्रम २०२५’ www.maa.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध असून, २८ जुलैपासून नागरिकांना अभिप्राय देता येणार आहे. अशी माहिती ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार यांनी दिली. सध्या तिसरी ते पाचवीसाठी असणाऱ्या ‘परिसर अभ्यास’ विषयाऐवजी ‘आपल्या सभोवतालचे जग (भाग एक, दोन) विषय असेल. चौथीसाठीचे विद्यमान पाठ्यपुस्तक ‘शिवछत्रपती’ आहे तसेच राहील. तिसरीसाठी जिल्हा, चौथीसाठी राज्य व पाचवीसाठी देश अशा पद्धतीने आशय आहे. इयत्ता अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम अंतिम झाल्यानंतर त्याआधारे राज्य मंडळाच्या अकरावी, बारावीचा अभ्यासक्रम तयार करण्यात येईल.
नवा अभ्यासक्रम कसा असेल : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या या अभ्यासक्रमामध्ये इयत्ता सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचे स्वतंत्र विषय असणार आहेत. नववी-दहावीसाठी आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण यांसारख्या नवकल्पना असतील. तर इयत्तानिहाय भारतीय ज्ञान प्रणाली, राज्यघटनात्मक मूल्ये, शाश्वत विकास, सामाजिक समावेशन आणि उद्योजकता कौशल्य यांचा समावेश असणार आहे.



