मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यात सध्या कृष्णजन्माष्टमीच्या तयारीला वेग आला आहे आणि गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने राज्यातील सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने महागाई भत्ता (DA) २ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली असून, हा निर्णय १ जानेवारी २०२५ पासून ३१ जुलै २०२५ पर्यंत लागू राहणार आहे. विशेष म्हणजे, जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीतील आठ महिन्यांची थकबाकीची रक्कमही कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे लाखो कुटुंबांना थेट आर्थिक फायदा होणार असून, कर्मचारीवर्गासाठी ही सणासुदीची आगाऊ दिवाळी ठरणार आहे.
याआधी केंद्र सरकारने मार्च २०२५ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २ टक्क्यांनी वाढवून ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के केला होता. आता राज्य सरकारनेही त्याच धर्तीवर ५३ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांपर्यंत भत्ता नेला आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील अधिकारी-कर्मचारी, जिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच राज्य सरकारकडून पेन्शन घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना होणार आहे.
दरम्यान, दिवाळीपूर्वी केंद्रातील मोदी सरकार महागाई भत्ता आणखी ३ टक्क्यांनी वाढवू शकते, असा अंदाज वर्तवला जात असून, तसे झाल्यास तो ५८ टक्क्यांवर पोहोचेल.
सरकारच्या या निर्णयाचे कर्मचारी संघटनांकडून स्वागत होत असून, सणाच्या तयारीत असलेल्या कर्मचारीवर्गासाठी ही आर्थिक भेट मोठा दिलासा ठरली आहे.
—————————————————————————————