कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
घरगुती प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्ती पाणवठ्यात विसर्जित करण्यावर असलेली बंदी उच्च न्यायालयाने उठवली आहे. मात्र, या मूर्ती विसर्जित कुठे करायच्या याबाबत निर्णय घेण्यास राज्य सरकारला सांगितले आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयाकडून ३० जून पर्यंत मुदत मागितली आहे.
मूर्ती विसर्जन करण्याबाबत राज्य सरकारने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तज्ञ समिती नेमली होती. या समितीने समुद्र, तलाव, नदीत पीओपीच्या मूर्ती विसर्जित न करता कृत्रिम पाणवठ्यात विसर्जित करण्यास सुचविले आहे. तर मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन कुठे करायचे हा प्रश्न अजूनही उपस्थित होतो. याबाबत ३० जून पर्यंत निर्णय घेण्याची उच्च न्यायालयाकडे राज्य सरकारने मुदत मागून घेतल्याची माहिती अॅड. सुर्यजीत रावराणे यांनी दिली.
उच्च न्यायालयाने पीओपीच्या गणेश मूर्ती समुद्र, नदी, तलाव, वा कोणत्याही नैसर्गिक पाणवठ्यात विसर्जित करू नये असा आदेश सन २०२० ला काढला होता. याबाबत अॅड. सुर्यजीत रावराणे व जागृत पाटील यांनी साबण, टूथपेस्ट, सौदर्य प्रसाधनाच्या साहित्य मध्ये पीओपीचे घटक असतात. ते ही पाण्यात मिसळतात मग पीओपीच्या गणेश मूर्तीना पाणवठ्यात विसर्जनास का बंदी, याच बरोबर पीओपी मूर्तीवरील रासायनिक रंगामुळे जल प्रदूषण होते. मग मूर्तींना पाणवठ्यात विसर्जन करण्याऐवजी पर्यावरणपूरक रंग वापरावेत असे अपील दाखल केले.
न्यायालयाने पीओपीच्या गणेश मूर्ती बनविण्यास व विक्री करण्यास बंदी नाही मात्र मूर्ती मुळे कोणत्याही प्रकारचे जल प्रदूषण होऊ नये याची दक्षता घेण्याचे राज्य सरकारला सुचवून गणेश मूर्ती पाणवठ्यात विसर्जित करण्याची बंदी उठवली. घरगुती गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी कृत्रिम पाणवठे निर्माण करावेत असेही न्यायालयाने सुचविले आहे.
————————————————————————————–