मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
२०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारने दिलेली अंतिम मुदत आता १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी ३० मार्च आणि ३० एप्रिल अशी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने सरकारने तिसऱ्यांदा ही मुदतवाढ जाहीर केली आहे.
परिवहन विभागाकडून सांगण्यात आले की, या कालावधीनंतरही जर वाहनावर HSRP नंबर प्लेट बसवलेली नसेल, तर संबंधित वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी तात्काळ ही नंबर प्लेट बसवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दररोज ३.१६ लाख वाहनांवर बसवायच्या प्लेट
राज्यात सुमारे कोट्यवधी जुन्या वाहनांना HSRP बसवणे आवश्यक आहे. यानुसार १५ ऑगस्टपूर्वी दररोज सरासरी ३ लाख १६ हजार ७१ वाहनांना नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. मात्र सध्या अनेक केंद्रांवर दीड ते दोन महिन्यांची प्रतीक्षा असून, अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी वाहनचालकांची झुंबड उडत आहे.
HSRP नंबर प्लेटचे दर (GST वगळता) :
| वाहनप्रकार | महाराष्ट्रातील दर | इतर राज्यांतील दर |
|---|---|---|
| दुचाकी | ₹450 | ₹420 – ₹480 |
| तीनचाकी | ₹500 | ₹450 – ₹550 |
| चारचाकी | ₹745 | ₹690 – ₹800 |
मुदत संपल्यानंतर दंड टळणार नाही
राज्य सरकारने याआधी दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर देखील अनेक वाहनचालकांकडून दुर्लक्ष झाल्याचे आढळून आले. यामुळे सरकारने आता ही शेवटची मुदत दिली असून, यानंतर वाहन तपासणी दरम्यान, HSRP नसलेल्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
HSRP बसवण्यासाठी वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा मान्यताप्राप्त वितरकांकडून ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. HSRP नंबर प्लेट आता केवळ पर्याय नाही, तर कायद्याचा भाग आहे. वेळेत नंबर प्लेट न बसवल्यास नको असलेली दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी १५ ऑगस्टपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करावी.
———————————————————————————————-



