कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील वाहनांची सुरक्षा आणि ओळख प्रमाणित करण्यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, अद्याप मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांनी हा नियम पाळलेला नाही. यामुळे शासनाने वाहनधारकांना दिलासा देत चौथ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी HSRP बसवण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२५ होती. मात्र, राज्यातील फक्त २० टक्के वाहनांना HSRP बसवण्यात आली असून, १० टक्के वाहनधारकांनी पैसे भरून वेळ घेतली आहे. अजूनही ७० टक्के वाहनांना पाटी लागलेली नाही. १४ ऑगस्टला चौथी मुदतवाढ जाहीर करण्यात आली. त्यानुसार आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाहनधारकांना HSRP बसवता येईल.
राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीची तब्बल २ कोटी ५४ लाख ९० हजार १५९ जुनी वाहने आहेत. त्यापैकी केवळ ४९ लाख ८९ हजार ६५६ वाहनांना HSRP बसवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच सुमारे ७ लाखांहून अधिक वाहनधारकांनी अद्याप नोंदणी केलेली नाही.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) स्पष्ट केले आहे की ही मुदतवाढ ही शेवटची संधी आहे. १ डिसेंबर २०२५ पासून HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक दंडात्मक कारवाईची मोहीम राबवली जाणार आहे.
HSRP नंबर प्लेटमुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित व अचूक होते, तसेच चोरी किंवा गैरवापराच्या घटनांमध्ये वाहन शोधण्यात सुलभता मिळते. त्यामुळे आरटीओने सर्व वाहनधारकांना मुदतीपूर्वी HSRP बसवण्याचे आवाहन केले आहे.
———————————————————————————————