spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeकृषीदत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषीमंत्री

दत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषीमंत्री

पदभार स्वीकारला

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

आज दत्तात्रय भरणे यांनी राज्याच्या कृषीमंत्री पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी कृषी विभागातील MPSC परीक्षेत यशस्वी ठरलेल्या १४ उमेदवारांच्या नियुक्तीच्या पत्रांवर स्वाक्षरी करत, कामाची धडाक्यात सुरुवात केली आहे.

पदभार स्वीकारताना भरणे म्हणाले, ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की, राज्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या. मी पूर्णपणे मदत करेन, असं आश्वासन  त्यांनी दिलं आहे. शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते मी करणार आहे.” त्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे.
विवादास्पद विधानामुळे चर्चेत
दरम्यान, कृषीमंत्री पद स्वीकारण्यापूर्वीच दत्तात्रय भरणे एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले होते. महसूल दिनाच्या कार्यक्रमात इंदापूर येथे बोलताना त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “ सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात.” त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, तर अनेक अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.
राजकीय प्रवास व सहकार क्षेत्रातील योगदान
दत्तात्रय भरणे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर त्यांनी सहकार क्षेत्रात पदार्पण केलं. १९९२ मध्ये ते छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले, १९९६ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, आणि २००० मध्ये बँकेचे अध्यक्षपद भूषवले. २००२ मध्ये ते साखर कारखान्याचे प्रमुख बनले. त्यांच्या या अनुभवामुळे त्यांना राजकारणात संधी मिळाली.
२०१४ मध्ये भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून विधानसभेत प्रवेश केला. २०१९ मध्ये पुन्हा विजय मिळवून त्यांनी महाविकास आघाडी सरकार मध्ये मंत्रीपद भूषवले. तेव्हा त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारीही पार पाडली.
२०२३ मध्ये पक्षांतर्गत फाटाफुटीच्या वेळी त्यांनी अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दिला. २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी इंदापूर मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवत शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील व अपक्ष प्रवीण माने यांचा १९,४१० मतांनी पराभव केला.
कृषीमंत्री म्हणून अपेक्षा वाढल्या
दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीं विषयी जाण असलेले नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आता कृषीमंत्री म्हणून त्यांच्या निर्णयाकडे राज्यातील शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांचं लक्ष लागले आहे. पहिल्याच दिवशी घेतलेल्या नियुक्तीच्या निर्णयामुळे त्यांनी कार्यक्षमतेचा इशारा दिला आहे, पण त्याचबरोबर वादग्रस्त विधानांमुळे त्यांना संयमी नेतृत्व सिद्ध करावं लागणार आहे.
———————————————————————————————-
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments