न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर ”दशावतार”

मराठी चित्रपटाचा नवा इतिहास

0
94
The teaser of 'Dashavataar' was screened on a giant screen in New York's Times Square and the audience responded enthusiastically.
Google search engine
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरलेला ‘दशावतार’ हा चित्रपट आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही; तो जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत जागतिक रंगमंचावर झळकू लागला आहे. महाराष्ट्रातील ऋढी परंपरा, संस्कृती, दमदार कथा आणि आधुनिक सिनेतंत्राचा संगम असलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचू शकतो याची खात्री निर्माण केली आहे.

न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवरील भव्य स्क्रीनवर ‘दशावतार’चा टीझर प्रदर्शित झाला आणि उपस्थितांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा क्षण मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल.

चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी या अनुभवाबाबत आपली भावना व्यक्त करत म्हटले, “दशावतार ही महाराष्ट्राच्या मातीतली गोष्ट असली तरी त्याचा विषय, त्यातली पात्रं आणि दिसणारा निसर्ग हा वैश्विक स्तरावर सहज आपलासा वाटणारा आहे. आणि त्यातच टाईम्स स्क्वेअरवर टीझर प्रदर्शित होणं ही आमच्या मेहनतीला मिळालेली आंतरराष्ट्रीय दाद आहे. टाईम्स स्क्वेअरवरील झळकलेला टीझर हे त्या जागतिक प्रवासाचं पहिलं पाऊल आहे. आता जगभरातील प्रेक्षक ‘दशावतार’ला कसा प्रतिसाद देतात, हे पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत.”

चित्रपटात मराठीतील दिग्गज कलाकारांची फौज दिसणार आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल आणि आरती वडगबाळकर यांसारख्या नावलौकिक लाभलेल्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. गुरु ठाकूर यांच्या प्रभावी संवाद आणि गाण्यांनी चित्रपटाला साहित्यिक आणि भावनिक खोली दिली आहे. तर ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे संगीत आणि दमदार निर्मितीमूल्यांनी हा चित्रपट एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार असल्याची खात्री निर्माण केली आहे.

येत्या १२ सप्टेंबरला ‘दशावतार’ चित्रपट प्रदर्शित होणार असून, महाराष्ट्राची ऋढी परंपरा, निसर्गाची भव्यता आणि लोककलेची सांस्कृतिक श्रीमंती यांचा नव्याने परिचय जगभरातील प्रेक्षकांना करून देणारा हा चित्रपट ठरणार आहे. मराठी अस्मितेचा जागतिक सोहळा ठरलेल्या या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
—————————————————————————————————-
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here