कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्य सरकारने खरीप-२०२५ आणि रब्बी हंगाम -२०२५-२६ या कालावधीसाठी उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी एका वर्षासाठी अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेची सुरुवातीची अंतिम मुदत ३१ जुलै होती, मात्र शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आणि संधीचा विस्तार लक्षात घेऊन मुदत १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, जिल्ह्यात आतापर्यंत ५८ कर्जदार आणि १०,०७६ बिगर कर्जदार, अशा एकूण १०,१३४ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. यामध्ये एकूण क्षेत्रफळ ३,१०१,०७ हेक्टर इतके आहे.
जिल्ह्यातील हवामानातील सततचा बदल, वेळी-अवेळी पडणारा पाऊस आणि त्यातून होणारे पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. यंदापासून योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, ई-पीक पाहणीद्वारे पिकांची नोंदणी व शेतकरी ओळख क्रमांक असणे बंधनकारक केले आहे. ई-पीक पाहणी व विमा माहितीमध्ये तफावत आढळल्यास विमा रद्द होणार असून, भरलेली हप्ता रक्कम जप्त केली जाणार आहे.
योजनेअंतर्गत विम्यास पात्र पिके – भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, कापूस व कांदा.
तालुकानिहाय पीक विमा उतरवलेले शेतकरी व क्षेत्रफळ
| तालुका | कर्जदार | बिगर कर्जदार | एकूण क्षेत्र (हे.) |
|---|---|---|---|
| आजरा | 0 | १४३ | ३८.९५ |
| गगनबावडा | 0 | ६ | १.०१ |
| भुदरगड | ७ | ७२३ | ८४.९९ |
| चंदगड | ३३ | १,९४९ | ९८१.८० |
| गडहिंग्लज | ३ | १,४९९ | ४२९.९८ |
| हातकणंगले | ४ | ८७२ | २९६.३७ |
| कागल | 0 | ८६५ | २४०.३१ |
| करवीर | १ | २७७ | ६०.०१ |
| पन्हाळा | ६ | ५५३ | १३०.१२ |
| राधानगरी | 0 | १,५४१ | २६५.०७ |
| शाहुवाडी | ४ | ५३८ | ६५.६० |
| शिरोळ | 0 | १,११० | ५२७.८६ |



