मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्रात यावर्षी अनेक विभागात अतिवृष्टी झाली. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला अतिवृष्टीचा फटका बसला. अतिवृष्टीने ७० लाख एकरवरील पीक हातचं गेलं आहे. तर अनेक गावात पूरस्थिती आहे. शाळा, घराचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य मंत्री मंडळाची सध्या कॅबिनेट बैठक सुरू आहे. पण त्यापूर्वीच एक मोठी वार्ता येऊन ठेपली आहे. पीक नुकसानीसाठी २ हजार, २१५ कोटींची मदत जाहीर झाली आहे. पीक नुकसानीसाठी मदत म्हणून ३१.६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. मदत व पूनर्वसन विभागाने याविषयीचा शासन निर्णय जाहीर केला असून खरीप २०२५ साठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे.
मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नुकसानीबाबत महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले कि, राज्यात विदर्भ, मराठवाड्यात पावसाने हाहाकार उडाला आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावांना पावसाने तडाखा दिला आहे. त्याचा आढावा सरकार सातत्याने घेत होतं. यापूर्वी विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला. तर आता विदर्भासह मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. यापूर्वीच्या नुकसानीचे आणि आताचे पंचनामे हे युद्धपातळीवर करण्यात येत आहे. आतापर्यंत जी आकडेवारी प्राप्त झाली आहे. त्यानुसार ३२ लाख शेतकऱ्यांचं मोठं नुकसान राज्यात झाले आहे.
त्यासाठी २ हजार, २१५ कोटींच्या मदतीला मंजूरी देण्यात आली आहे. हा निधी आजच शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करता येईल. यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांचा आणि मराठवाड्यातील धाराशिवसह नांदेड आणि बीडमध्ये मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या पट्ट्याचा समावेश आहे. तर आता पावसामुळे जे नुकसान झाले आहे. त्याचा आढावा सुद्धा घेतला जात आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार विरोधी पक्ष करत आहेत. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानग्रस्त गावांची, जिल्ह्यांची विभागवार आकडेवारी तयार करण्यात आली आहे. युद्धपातळीवर ही मदत आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. अनेक भागात अद्यापही पाणी आहे, त्यामुळे तिथे पंचनामे झालेले नाहीत. पाणी ओसरल्यावर याठिकाणचे पंचनामे करण्याचे कामही करण्यात येणार आहे.
—————————————————————————————————