अमोल शिंगे : प्रसारमाध्यम डेस्क
महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या काही वर्षांत समाजाच्या विविध घटकांच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळांची स्थापना करून सामाजिक न्याय, आर्थिक सबलीकरण आणि क्षेत्रीय संतुलनाचा नवा पायाच रचला आहे. विशेष म्हणजे या महामंडळांची स्थापना केवळ निधीपुरती मर्यादित न राहता योजनांची अंमलबजावणी, सक्षमीकरण आणि संवादाचा एक मंच म्हणून उदयास आली आहे. मात्र अजूनही सामन्य नागरिकांना महामंडळे, त्यांच्या कार्यप्रणाली, त्यावर होणाऱ्या निवडी आणि ती महामंडळे कोणत्या मंत्रालयांतर्गत काम करतात या प्रक्रियाच माहित नाहीत.
राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामार्फत विविध क्षेत्रांमध्ये विकास आणि कल्याणकारी योजना राबवण्यासाठी अनेक महामंडळे स्थापन करण्यात आली आहेत. ही महामंडळे आपापल्या क्षेत्रांमध्ये विशिष्ट उद्दिष्टांसाठी काम करतात आणि त्यांचे कामकाज संबंधित मंत्रालयांच्या देखरेखेखाली चालते. महाराष्ट्रामध्ये विविध महामंडळांची स्थापना वेगवेगळ्या वर्षी झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी महामंडळाची सर्वात पहिल्यांदा स्थापना झाली आहे. सन १९४८ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची झाली आहे. तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना १९६२ मध्ये झाली. महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाची स्थापना १ एप्रिल १९६२ रोजी झाली. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना ८ ऑगस्ट १९५७ रोजी झाली. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची (महाबीज) स्थापना १९७१ मध्ये झाली. महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना १६ फेब्रुवारी १९७४ रोजी झाली. अशी चार प्रकारची एकूण ३१ महामंडळे आपल्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. ते चार प्रकार कोणते आहेत ते आपण पहिल्यांदा पाहू..
१. आर्थिक विकास:
उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणे, नवीन उद्योग सुरू करण्यासाठी मदत करणे, आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे.विशिष्ट क्षेत्रांमध्ये (उदा. औद्योगिक, कृषी, किंवा पर्यटन) विकास करणे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागांचा विकास करणे.
२. सामाजिक विकास:
समाजातील दुर्बल घटकांना (उदा. महिला, अनुसूचित जाती-जमाती) मदत करणे. शिक्षण, आरोग्य, आणि इतर सामाजिक सेवा पुरवणे. सांस्कृतिक वारसा जतन करणे.
३. पायाभूत सुविधांचा विकास:
रस्ते, वीज, पाणी, आणि इतर आवश्यक सुविधा पुरवणे. औद्योगिक वसाहती आणि शहरे विकसित करणे.
४. विशिष्ट सेवा पुरवणे:
विमा, बँकिंग, आणि इतर वित्तीय सेवा पुरवणे. अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंची खरेदी-विक्री करणे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे राज्यामध्ये औद्योगिक विकास घडवण्यासाठी आणि उद्योगांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, महिला आर्थिक विकास महामंडळ हे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करते. या उद्देशांसाठी महामंडळांची स्थापना झालेली आहे. पण सध्या या महामंडळांकडे कार्यकर्त्यांची राजकीय सोय लावण्याचे एक साधन म्हणून पाहिलं जात आहे. निवडणुका जवळ आल्या की कार्यकर्ते नाराज होऊ नयेत म्हणून त्यांना नेहमीच या महामंडळांचे गाजर दाखवले जाते. कार्यकर्त्यांचा पण महामंडळांवर नियुक्ती व्हावी म्हणून आपल्या नेत्यांकडे आग्रह असतो पण या बऱ्याच अंशी कार्यकर्त्यांना कोणतं महामंडळ कोणत्या मंत्रालयांतर्गत आणि शासनाच्या विभागांतर्गत काम करतं आणि आपण नियुक्तीसाठी कुठे प्रस्ताव द्यायचा हेच मुळात माहित नसतं. आपण या निमित्ताने काही महत्वाची महामंडळे कोणत्या मंत्रालयांतर्गत आणि शासनाच्या विभागांतर्गत काम ते थोडक्यात पाहू..
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ:
इतर मागासलेल्या (OBC) समुदायाचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे हे या महामंडळाचे उद्दिष्ट आहे. हे महामंडळ इतर मागास बहुजन कल्याण विभागाशी संलग्न आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ:
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि विकास कार्यासाठी हे महामंडळ काम करते. हे महिला व बाल विकास विभागाशी संलग्न आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC):
औद्योगिक विकासाला चालना देणे, औद्योगिक वसाहती स्थापन करणे, आणि उद्योगांना आवश्यक सुविधा पुरवणे हे या महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाशी संलग्न आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC):
रस्ते आणि पूल बांधणी, त्यांची देखभाल करणे आणि वाहतूक व्यवस्था सुधारणे हे या महामंडळाचे काम आहे. हे सार्वजनिक बांधकाम विभागाशी संलग्न आहे.
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ:
ग्रामीण भागातील कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) विभागाशी संलग्न आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ:
शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि शेतीमालाच्या विक्रीची व्यवस्था करणे हे या महामंडळाचे उद्दिष्ट आहे. हे कृषी विभाग, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाशी संलग्न आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक:
सहकारी संस्थांना पतपुरवठा करणे आणि त्यांची आर्थिक व्यवस्था सांभाळणे हे या बँकेचे काम आहे. हे सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाशी संलग्न आहे.
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (MTDC):
राज्यामध्ये पर्यटन विकासाला प्रोत्साहन देणे, पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करणे आणि पर्यटन स्थळांचा विकास करणे हे या महामंडळाचे उद्दिष्ट आहे. हे पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाशी संलग्न आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी :
राज्यामध्ये वीज वितरण आणि वीज पुरवठा करण्याचे काम या कंपनीचे आहे. हे ऊर्जा विभाग आणि महावितरण विभागाशी संलग्न आहे.
एकूण महामंडळे
• महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळ
• महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
• महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ
• महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ
• महाराष्ट्र शहर औद्योगिक विकास महामंडळ
• महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लि.
• महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ
• महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
• महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ
• महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्या.
• हाफकीन बायो-फार्मास्युटीकल महामंडळ मर्या.
• हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था
• तापी पाटबंधारे विकास महामंडळ
• महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित
• महाराष्ट्र राज्य अपंग, वित्त व विकास महामंडळ
• इतर मागासवर्ग विकास महामंडळ
• संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.
• वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ
• लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित
• महाराष्ट्र वखार महामंडळ मर्या.
• महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या.
• महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या.
• महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्या.
• महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ
• मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ
• अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित
• महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
• महिला आर्थिक विकास महामंडळ मर्या.
• महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापन २०१०
• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ
• महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्या.
मंडळे
• महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
• महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ
• महाराष्ट्र ज्ञान महामंडळ
• महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ
• महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
• महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
• महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ
• महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
आपण प्रसारमाध्यमच्या या विशेष वृत्तातून महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या महामंडळांच्या स्थापनेचा, उद्देशांचा आणि कार्यपद्धतीचा आढावा घेतला. महामंडळे म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांची राजकीय सोय लावण्याची साधने या राजकीय वृत्तीच्या पलीकडे जाऊन महामंडळांची निर्मिती ज्या उद्देशांसाठी करण्यात आली आहे त्या उद्देशांवर प्रामाणिकपणे काम केल्यास या महामंडळांच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित जाती, पंथांना आणि प्रत्येक सामाजिक घटकांना विकासाचा मार्ग तयार होईल..
————————————————————————————————