पुणे : प्रसारमाध्यम न्यूज
देशातील दळणवळण अधिक वेगवान आणि किफायतशीर व्हावे, यासाठी नवसंकल्पना आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याचा पुनरुच्चार करत देशात मोठ्या प्रमाणावर बोगदे (टनेल्स) निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. पुण्यात आयोजित आंतरराष्ट्रीय टनेल वर्कशॉप परिषदेत ते बोलत होते.
गडकरी म्हणाले, “देशात येणाऱ्या काळात ३ लाख कोटी रुपयांचे टनेल निर्माण केले जाणार आहेत. बोगदे तयार करण्याच्या तंत्रज्ञानात आपण स्वयंपूर्ण व्हायला हवे. सध्या जगात बोगदे तयार करणाऱ्या मशिन्स चीनमध्ये बनवतात. मात्र, आपण चीनकडून हे घेऊ शकत नाही, याची कारणे तुम्हाला माहित आहेत. त्यामुळे भारतातच ही उपकरणं बनवणं अत्यंत आवश्यक आहे.”
शेतीसाठी पर्यायी इंधनाचा वापर आवश्यक
शेतीमध्येही नवतंत्रज्ञान आणि पर्यायी इंधनाचा वापर अनिवार्य असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. “शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर आपण आता इलेक्ट्रिक, इथेनॉल आणि CNG वर चालणारे बनवत आहोत. माझ्या स्वतःच्या शेतात मी CNG ट्रॅक्टरचा वापर करतो. इंधन खर्च कमी करण्यासाठी आणि पर्यावरण पूरक शेतीसाठी अशा पर्यायी इंधनाच्या ट्रॅक्टर्सचा वापर करावा लागेल,” असे ते म्हणाले.
देशाच्या प्रगतीसाठी भक्कम पायाभूत सुविधा गरजेच्या
बोगदे हे देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे गडकरी यांनी सांगितले. पर्वतीय भागात आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी टनेल्सचा मोठा फायदा होतो. मात्र, टनेल बांधताना सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या परिषदेत तज्ज्ञांनी टनेल बांधणीसाठी वापरल्या जाणाऱ्या नव्या तंत्रज्ञानावर चर्चा केली. गडकरी यांच्या वक्तव्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारणीसाठी स्थानिक तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
———————————————————————————————–






