spot_img
शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025

9049065657

Homeराजकीयमंत्रालयाच्या नवीन सहइमारतीचे बांधकाम सुरु

मंत्रालयाच्या नवीन सहइमारतीचे बांधकाम सुरु

वीस मंत्र्यांची सोय आधुनिक आणि सुसज्ज दालने

कोल्हापूर : प्रसारमाध्यम

मंत्रालयाच्या पुनर्विकासाचा प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडला असला, तरी आता मंत्रालयाला लागूनच मंत्रालय ॲनेक्सची पाच मजली नवीन इमारत बांधण्यास सुरुवात  झाली आहे. ११० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या इमारतीमध्ये २० मंत्र्यांना आधुनिक आणि सुसज्ज दालने उपलब्ध होतील. शिवाय अभ्यागतांसाठीही सोयीसुविधा असतील. नव्या इमारतीचे बाह्यस्वरूप सध्याच्या मंत्रालय इमारतीशी सुसंगत असणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सध्या ४० मंत्री आहेत. मागच्या उद्धव ठाकरे, तसेच एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळातील काही जागा विस्तारासाठी शिल्लक ठेवण्यात आल्या होत्या. साहजिकच मंत्रिमंडळात कमी मंत्री असल्याने यातील बहुसंख्य मंत्र्यांनी इतरांची कार्यालयेही काबीज केली होती. ती पुढे तशीच राहिली होती. नोव्हेंबर २०२४मध्ये सत्तेवर आलेल्या महायुती सरकारमध्ये मंत्र्यांची संख्या थेट ४०वर पोहोचली. मंत्र्यांची कमाल संख्या जवळपास पूर्ण झाल्याने अनेक राज्यमंत्र्यांना मंत्रालयात दालनेच शिल्लक राहिली नाहीत.

काही मंत्र्यांना विधानभवनात, तर काही कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या सातव्या मजल्यावर जागा देण्यात आली. मंत्र्यांची कार्यालये मंत्रालयाबाहेर फेकली गेल्याने त्याचा परिणाम विभागाच्या कामकाजावर जाणवू लागला आहे. त्यामुळे काही राज्यमंत्र्यांकडून सोयीसुविधांनी युक्त असलेली कार्यालये मिळावीत, त्यांना भेटायला राज्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या जनतेला पुरेशी बसण्याची आसनव्यवस्था असलेली कार्यालये हवीत, अशी मागणी करण्यात आली होती.

या मागणीचा विचार करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला मंत्र्यांसाठी सुसज्ज इमारत बांधण्याचे लक्ष्य दिले. विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी बांधकाम खात्यातील अनुभवी आणि तज्ज्ञ अभियंत्यांच्या मदतीने इमारत बांधकामाचा कार्यारंभ आदेश १ एप्रिल, २०२५ रोजी काढला. मंत्रालयाची नवी इमारत १०० दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून इमारतीसाठी जागा शोधण्यापासून ते विविध परवानग्या मिळवण्यापर्यंत; तसेच मंत्रालय परिसरातील दिवसभराची वर्दळ आणि इमारतीचा पाया खणताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यांचा सामना करून नवी इमारत ऑगस्ट २०२५पर्यंत बांधून पूर्ण केली जाणार आहे.

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या शेजारी असलेल्या उद्यानाच्या जागेवर इमारत उभारणीला प्रारंभ झाला आहे. या इमारतीसाठी सुरुवातीला सात मजल्यांची परवानगी मागण्यात आली होती. तूर्तास, मुंबई महापालिकेने तळमजला अधिक पाच अशी इमारत बांधण्यास परवानगी दिली आहे. इमारतीचे बांधकाम विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करायचे असल्याने विभागाने दिवसा आणि रात्रीच्या वेळी इमारतीचे बांधकाम करण्यास विशेष परवानगी मिळवली आहे. सध्या इमारतीचा पाया खणण्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. पाया खणून पूर्ण झाल्यानंतर इमारत उभारणीला वेग येणार आहे.

अशी असतील वैशिष्ट्ये…
– प्री फॅब या आधुनिक तंत्राने सिमेंट आणि स्टील यांच्या मिश्रणाने पर्यावरणपूरक इमारत विक्रमी वेळेत उभी राहणार
– इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर चार मंत्री दालने आणि त्यांच्या कर्मचारी वर्गासाठी कार्यालय
 – मंत्र्यांना शासकीय बैठका घेण्यासाठी प्रत्येक मजल्यावर बैठक कक्ष
– तळमजल्यावर अभ्यागतांसाठी चहापानाची सुविधा असलेले कॉफी हाऊस

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments