मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्र विधानसभेत ‘जनसुरक्षा विधेयक २०२५’ मोठ्या बहुमताने मंजूर झाले असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत. विधेयकावर मतदानाच्या वेळी काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार अनुपस्थित राहिल्यामुळे पक्षातच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी काँग्रेस हायकमांडने त्यांच्यावर कारवाई करत स्पष्टोत्तर मागवण्यासाठी त्यांना नोटीस बजावली आहे.
काँग्रेस हायकमांकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि अमीन पटेल यांच्याकडे अहवाल मागवल्याची माहिती समोर येत आहे. जन सुरक्षा विधेयकाला विरोध का केला नाही? याचा अहवाल सादर करावा, अशी नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांनी आम्हाला कुठलीही नोटीस आलेली नाही, असे म्हटले आहे.
या विधेयकावर केवळ कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी स्पष्ट विरोध दर्शवला. काँग्रेसकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे, ज्या दिवशी हे अत्यंत महत्त्वाचे विधेयक सभागृहात सादर करण्यात आले, त्या दिवशी विजय वडेट्टीवार यांनी चक्क दांडी मारली होती. त्यामुळे काँग्रेसचे अन्य आमदारही गोंधळात सापडले होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, हायकमांडची कुठलीही नोटीस मला आलेली नाही. बँकेची निवडणूक होती त्यामुळे विधेयकाला मी उपस्थित नव्हतो. सभागृहात काँग्रेसचे नेते होते त्यांनी योग्य बाजू मांडली. त्यांनी केलेले भाषण आम्ही हाय कमांड कडे पाठवणार आहोत. प्रदेशाध्यक्षांना सुद्धा देणार आहोत. खरे तर त्या दिवशी वॉक आउट करणं गरजेचं होतं. तोंड दाबण्याचे काम सरकार करत आहे. प्रदेशाध्यक्षांनी एक नोट मला दिली होती. बाकी आमदारांकडे सुद्धा ती नोट होती. पण, सभागृहामध्ये हे बिल आले तेव्हा सरकारने सांगितले की, समितीमध्ये चर्चा झाली आहे. तिथे फार चर्चा करता येणार नाही.
जनसुरक्षा विधेयक अचानक सभागृहात आलं : सतेज पाटील
तर सतेज पाटील म्हणाले की, जन सुरक्षा विधेयकाच्या वेळी आम्ही सभागृहात होतो. विजय वड्डेटीवार यांच्याशी माझं बोलणं होईल. आता माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही. जनसुरक्षा विधेयक अचानक सभागृहात आलं. त्यामुळे ते उपस्थित नसतील. जनसुरक्षा विधेयकाबाबत आम्ही नेमकी काय बाजू मांडली? हे आम्ही पक्षश्रेष्ठींना कळवू. समितीमध्ये सुद्धा सूचना दिल्या होत्या. आम्ही जी काय माहिती आहे ती पक्षाला कळवू, असे त्यांनी म्हटले.
सूत्रांच्या माहितीनुसार, विधेयकावर पक्षाची भूमिका काय असावी, हे मतदानानंतर काँग्रेस आमदारांना सांगण्यात आले. त्यामुळे ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशी अवस्था काँग्रेसची झाली. या घोळामुळे विधेयकावरील पक्षाची अधिकृत भूमिका संदिग्ध राहिली, आणि वडेट्टीवार यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला.
दुसरीकडे, सरकारने मांडलेल्या ‘जनसुरक्षा विधेयक २०२५’ चा उद्देश कायदा-सुव्यवस्था राखणे, समाज विघातक कृत्यांवर नियंत्रण ठेवणे आणि भडकावू वर्तनाला आळा घालणे असा असल्याचे सांगितले. या विधेयकानुसार पोलिसांना विशेष अधिकार देण्यात आले असून, संशयितांना २४ तासांपेक्षा अधिक काळ ताब्यात ठेवण्याची मुभा आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा हिंसक पोस्ट शेअर करणाऱ्यांवरही कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.
विरोधकांनी मात्र या विधेयकाला जबरदस्तीची आणि दडपशाहीची सुरुवात असल्याचे म्हणत तीव्र टीका केली आहे. विरोधकांचा आरोप आहे की, या कायद्याचा वापर करून सरकार विरोधकांना लक्ष्य करू शकते. मात्र, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “हा कायदा निष्पाप नागरिकांवर नव्हे, तर समाजात भीती निर्माण करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करेल.” हे विधेयक आता विधानपरिषदेपुढे मांडले जाणार असून, तिथून मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम अधिसूचना काढण्यात येईल.
———————————————————————————————–