विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा अंबादास दानवे यांचा कार्यकाळ २९ ऑगस्टला संपुष्टात आल्यानंतर हे पद सध्या रिक्त आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने या पदावर दावा सांगितला आहे. विधान परिषदेत काँग्रेसचे आठ तर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सहा आमदार आहेत. त्यामुळे संख्याबळाच्या आधारे काँग्रेसने आपली मागणी अधिक ठामपणे मांडली आहे.
सध्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता नवीन विरोधी पक्षनेत्याची निवड अपेक्षित आहे. काँग्रेसकडून या पदासाठी आघाडीतील समन्वय समितीकडे औपचारिक मागणी लवकरच करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विरोधी पक्षांमध्ये या मुद्द्यावर मतभेद होण्याची शक्यता असून, महाआघाडीत यावर एकमत साधण्यासाठी चर्चा सुरू असल्याचेही बोलले जात आहे. विधान परिषद ही राज्यातील महत्त्वाची दुसरी सभा असून, येथे विरोधी पक्षनेतेपदाला संसदीय कामकाजात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होते, याकडे राज्याच्या राजकारणात लक्ष लागले आहे.
सध्या विधान परिषदेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचं संख्याबळ हे अधिक आहे आणि त्यामुळे विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा काँग्रेस पक्षाचे आठ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन आमदार आहेत. विधान परिषद विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे असावं यासाठी काँग्रेस नेत्यांनी ‘मातोश्री’वरील भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली.
विधिमंडळात पहिल्यांदाच सद्यस्थितीत विरोधी पक्षनेते पद ना विधानसभेत आहे ना विधान परिषदेत त्याच्यामुळे तातडीने विरोधी पक्षनेते पद देण्यात यावे अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आधीच दावा केला आहे तर आता विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून दावा केला गेला आहे. विधानसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हावा यासाठी आमची हरकत नाही, मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळायला हवे, अशी भूमिका या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी मांडल्याचे कळते.