मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत नवे समीकरण घडताना दिसत आहे. अंबादास दानवे यांचा कार्यकाळ २९ ऑगस्टपर्यंत असला तरी त्यांच्या जागी काँग्रेसकडून सतेज पाटील यांचे नाव पुढे येत असून, या पदासाठी आता जोरदार खलबतांना सुरुवात झाली आहे.
काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे द्यावे, अशी ठाम मागणी केली आहे. संख्याबळाच्या आधारावर हे पद काँग्रेसच्या वाट्याला यावे, यासाठीच ही भेट झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
विधान परिषदेमधील सद्यस्थिती :
-
काँग्रेसचे आमदार – ८
-
सतेज पाटील, प्रज्ञा सातव, भाई जगताप, अभिजीत वंजारी, धीरज लिंगाडे, राजेश राठोड, जयंत आसगावकर (पुणे शिक्षक मतदारसंघ), सुधाकर आडबाले (नागपूर शिक्षक मतदारसंघ – काँग्रेस पुरस्कृत)
-
-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) – ७
-
अंबादास दानवे (२९ ऑगस्टपर्यंत), अनिल परब, सचिन अहिर, सुनील शिंदे, ज. मो. अभ्यंकर, मिलिंद नार्वेकर, उद्धव ठाकरे
-
-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – ३
काँग्रेसकडे संख्याबळ अधिक असल्यामुळे विधानपरिषदेत त्यांचा नैसर्गिक हक्क असल्याचा युक्तिवाद आता उघडपणे पुढे आला आहे. याच पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत आहे. पाटील हे माजी गृहराज्यमंत्री असून विधान परिषदेतील अनुभवी सदस्य आहेत.
दरम्यान, विधानसभेत अद्याप विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय लांबलेला असताना, सरकारने तो विषय सभापतींकडे टोलवला आहे. त्यामुळे विधान परिषदेमधील नेतृत्वाचा निर्णय महाविकास आघाडीच्या अंतर्गत बळावर अधिक ठरणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे, अंबादास दानवे यांची आमदारकीची मुदत संपेपर्यंत म्हणजे २९ ऑगस्टपर्यंत तेच या पदावर राहतील. त्यानंतरचा निर्णय आघाडीच्या समन्वयावर अवलंबून असेल.
काँग्रेसने जो टोकाचा दावा लावला आहे, त्यातून हे स्पष्ट होते की विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद आता कोणाकडे जाते, यावर केवळ महाविकास आघाडीतील नेतृत्व नव्हे, तर आगामी राजकीय समीकरणांवरही परिणाम होणार आहे. लवकरच या संदर्भात अंतिम घोषणा होण्याची शक्यता असून सतेज पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली, तर ते विधान परिषदेमधील काँग्रेसच्या नेतृत्वाचे नवे चेहरा ठरतील.
————————————————————————————————-






