The 63rd annual general meeting of the Kolhapur District Milk Association (Gokul) was marred by chaos and controversial discussions today.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकुळची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज गोंधळ आणि वादग्रस्त चर्चांनी गाजली. सभा सुरू असतानाच संचालिका शौमिका महाडिक यांनी विषय क्रमांक ९ ला विरोध दर्शवत सभेचे वातावरण तापवले. विषय क्रमांक ९ अंतर्गत सभासद संख्या २१ वरून २५ वर नेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असला तरी त्यामागचं कारण स्पष्ट करण्यात आले नाही, असा आरोप महाडिक यांनी केला. “सभासदांना याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नाही. ही निव्वळ राजकीय सोय आहे,” असं त्या म्हणाल्या.
शौमिका महाडिक बोलण्यासाठी उभ्या राहिल्यानंतर थोड्याच वेळात सभागृहात गोंधळ सुरू झाला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर माईक बंद करण्यात आल्याची तक्रार त्यांनी माध्यमांसमोर केली. त्यावर स्टेजवरून “ तुमच्या लोकांना गोंधळ बंद करायला सांगा,” असं सांगण्यात आले असता, त्या म्हणाल्या, “ कोणी धक्काबुक्की केलेली नाही, कोणी घोषणाबाजी केलेली नाही. माझ्या प्रश्नांना उत्तर दिलं पाहिजे.” पुढे त्या म्हणाल्या, “ उत्तर मिळत नाहीये, हा पळपुटेपणा आहे,” आणि “काल तुम्ही जे बोललात तेच आज पुन्हा रिपीट करताय,” अशी टीका केली. तसेच “माझ्या प्रश्नांची लेखी उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत,” अशी तक्रार त्यांनी नोंदवली.
दरम्यान, गोंधळ सुरू असतानाच गोकुळचे नवे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी संघाच्या आगामी योजना जाहीर केल्या. “गोकुळ भविष्यात आईस्क्रीम आणि चीज बाजारात आणणार आहे,” अशी घोषणा त्यांनी केली. तसेच नवी मुंबई शाखेसाठी वाशीत मदर डेअरीची जागा खरेदी करण्याची योजना जाहीर केली. पुढे त्यांनी गोकुळच्या विस्तार योजनांची माहिती देताना सांगितले की, “ गोकुळ सीएनजी पंप आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणार असून वासरू संगोपन केंद्रातून ५०० वासरे तयार करण्यात येणार आहेत.” याशिवाय “गोकुळ सिताफळ, अंजीर आणि गुलकंद बासुंदी यांसारखी नवी उत्पादने बाजारात आणणार आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.
सभेचा शेवट वाद आणि घोषणांनी रंगलेला असला तरी गोकुळच्या आगामी योजनांवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. शौमिका महाडिक यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि नवीद मुश्रीफ यांनी केलेल्या घोषणा यामुळे गोकुळच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.