कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय ( सीपीआर ) परिसरातील विविध इमारतींच्या नूतनीकरणाची सर्व कामे ऑक्टोबर अखेर पूर्ण करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) परिसरातील विविध इमारतींच्या नूतनीकरणाच्या कामांची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सीपीआर मध्ये पार पडली.
मंत्री हसन मुश्रीफ – सीपीआर मधील इमारतींचे नूतनीकरण होण्यासाठी सध्या दाखल असणाऱ्या रुग्णांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णांच्या स्थलांतराचे योग्य नियोजन करा. या इमारती ठेकेदाराच्या ताब्यात दिल्यानंतर येथील कामांचा पाठपुरावा सीपीआर प्रशासनाने घ्यावा. यासाठी नोंदवही अद्ययावत ठेवा. इमारत कामासाठी ताब्यात दिल्याची तारीख व कामांची दैनंदिन सद्यस्थिती आदी नोंदी ठेवा. गळती होत असलेल्या इमारतींची दुरुस्ती करा. इमारतींवर सोलर पॅनल बसवून घ्या. सीपीआर मधील इमारतींची कामे, परिसरातील रस्ते बांधिव गटर व फूटपाथ तसेच या परिसरातील सर्व कामे दर्जेदार होतील याकडे लक्ष द्या, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
सीपीआर परिसरातील कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी सीपीआर प्रशासनाने इमारतींचा ताबा लवकरात लवकर मिळावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले. याबाबत बोलताना सीपीआर परिसरातील नूतनीकरणाची कामे गतीने पूर्ण होण्यासाठी रुग्णांची गैरसोय न होवू देता त्यांचे पर्यायी जागेत स्थलांतर करुन इमारतींचा ताबा देण्यात येईल, असे अधिष्ठाता डॉ.एस. एस. मोरे यांनी सांगितले.
यावेळी सीपीआरचे अधिष्ठाता डॉ.एस. एस. मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने, माजी वैद्यकीय अधीक्षक तथा सहयोगी प्राध्यापक डॉ. शिशिर मिरगुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश कांबळे, डॉक्टर रणजीत जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश कांजर, कनिष्ठ अभियंता आशिष पाटील विद्युत विभागाचे उपअभियंता नवनाथ बनसोडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
————————————————————————————-