नवी दिल्ली : प्रसारमाध्यम न्यूजसेवा
देशातील व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत आजपासून मोठी कपात करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ५१.५० रुपयांची घट केली आहे. या दर कपातीनंतर दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ₹१५८० इतकी झाली आहे. ही दर कपात १ सप्टेंबरपासून लागू झाली आहे.
एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती दर महिन्याच्या पहिल्या दिवशी पुनर्रचित केल्या जातात आणि त्या जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरावर अवलंबून असतात. यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत घट करण्यात आली होती, ज्याचा थेट फायदा हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांना झाला होता. यंदाही ही कपात महागाईने त्रस्त छोट्या व्यावसायिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मदत
केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर ३०० अनुदान जाहीर केले आहे. ही सबसिडी २०२५-२६ या वर्षासाठी लागू असेल आणि जास्तीत जास्त ८ वेळा (रिफिल) मिळणार आहे. ५ किलो सिलेंडर घेणाऱ्यांना ही सबसिडी प्रमाणानुसार लागू असेल. देशभरात आतापर्यंत १०.३३ कोटींहून अधिक उज्ज्वला सिलेंडर वितरित करण्यात आले आहेत.
घरगुती ग्राहकांना लाभ नाही
घरगुती ग्राहकांना मात्र अजूनही दिलासा मिळालेला नाही. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही. सध्या दिल्लीत घरगुती सिलेंडरची किंमत ८५३ आहे. गेल्या दशकात घरगुती एलपीजी कनेक्शनची संख्या दुप्पट झाली असून एप्रिल २०२५ पर्यंत ती सुमारे ३३ कोटींवर पोहोचली आहे.
हॉटेलसह व्यावसायिकांना लाभ
व्यवसायिक गॅस सिलेंडर कपातीचा फायदा रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांना होणार आहे.
————————————————————————————————



