spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeधर्मसहजीवनात संवाद, समज आणि संयम हवाच...

सहजीवनात संवाद, समज आणि संयम हवाच…

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे विवाह न करता दोन प्रौढ व्यक्तींनी परस्पर संमतीने एकत्र राहणे. अशा प्रकारच्या नातेसंबंधांना भारतीय कायद्यात विशिष्ट स्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने अशा नात्यांना काही अटीं सह मान्यता दिली आहे, जसे की दोन्ही व्यक्ती प्रौढ असाव्यात, जबरदस्ती किंवा फसवणूक नसावी आणि दोघांचे नाते सार्वजनिकरित्या सहजीवनासारखे असावे. अनेक तरुण-तरुणी विवाहपूर्व किंवा विवाहविना सहजीवनाचा पर्याय म्हणून लिव्ह-इन रिलेशनशिप निवडतात. परंतु, अशा नात्यांमध्ये विश्वास, सुरक्षितता आणि मानसिक समजूतदारपणा अत्यंत महत्त्वाचा असतो. सामाजिकदृष्ट्या अजूनही हा प्रकार वादग्रस्त मानला जातो.

कोल्हापूरच्या सरनोबतवाडी भागात ३ जून २०२५ रोजी २३ वर्षीय समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे हिचा तिच्या लिव्ह-इन पार्टनर सतीश मारुती यादव याने चाकूने भोसकून निर्घृण खून केला. समीक्षा ही मूळची कसबा बावड्याची असून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करत होती. सतीश यादव याच कंपनीत तिचा सहकारी होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली होती. घटनेच्या दिवशी समीक्षा तिच्या मैत्रिणीसह जुना फ्लॅट रिकामा करण्यासाठी आली होती. याचवेळी सतीशने तिथे येऊन लग्नासाठी दबाव टाकला. तिने नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या सतीशने तिला चाकूने छातीत भोसकून ठार मारले आणि घटनास्थळावरून फरार झाला. अशा प्रकारच्या विकृत मानसिकते मुळे समाजात नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. यासाठी योग्य समुपदेशन गरजेचे आहे.

महाराष्ट्रात लिव्ह-इन रिलेशनशिप आणि विवाहविषयक संबंधांमध्ये लक्षणीय बदल दिसून येतो. नागपूरमधील ‘भरोसा सेल’च्या अहवालानुसार, २०१७ ते २०२५ या कालावधीत एकूण १६,९४६ प्रकरणांपैकी १३३ प्रकरणे लिव्ह-इन रिलेशनशिपशी संबंधित होती. याच कालावधीत लव्ह मॅरेजशी संबंधित तक्रारींमध्ये ११०% वाढ झाली आहे, तर अरेंज मॅरेजच्या तक्रारींमध्ये ६६% वाढ झाली आहे. महाराष्ट्रात घटस्फोटाचे प्रमाण सुमारे १.८% आहे, जे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरी भागांतील व्यावसायिक दडपण, बदलती सामाजिक भूमिका आणि कायदेशीर सुधारणा यामुळे विवाहसंस्थेतील तणाव वाढत आहे.

या प्रकारच्या हिंसक घटनांकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. अशा घटनांच्या मुळाशी काही मानसिक पद्धती आणि शिकण्याच्या प्रक्रियेचे परिणाम असतात. 

डॉ.अल्बर्ट बँडुरा

डॉ.अल्बर्ट बँडुरा (Albert Bandura) – हे कॅनेडियन-अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी सामाजिक शिक्षण सिद्धांत (Social Learning Theory) मांडला, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की माणूस फक्त प्रत्यक्ष अनुभवांद्वारे नाही, तर निरीक्षणातून, अनुकरणातून आणि माध्यमांद्वारेही शिकतो. जर एखादी व्यक्ती हिंसा, जबरदस्ती, किंवा भावनिक दडपशाही हे मार्ग चित्रपट, सोशल मीडिया किंवा सभोवतालच्या उदाहरणांतून वारंवार पाहते, तर ती त्या वर्तनाचे अनुकरण करण्याची शक्यता वाढते. सतीशने केलेली प्रतिक्रिया ही अशाच शिकवणुकीचा संभाव्य परिणाम मानता येईल, जिथे त्याने नकार सहन न करता आक्रमकतेचा मार्ग निवडला.

डॉ. अल्बर्ट एलिस

 

डॉ. अल्बर्ट एलिस (Albert Ellis) –  हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी मांडलेला ‘Rational Emotive Behavior Therapy (REBT)’ सिद्धांतही या प्रकारच्या घटना समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतो. एलिस यांच्या मतानुसार, एखाद्या व्यक्तीची भावना आणि वर्तन ही त्या व्यक्तीच्या विचारांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, सतीशच्या मनात ‘ती जर माझ्याशी लग्न करत नसेल, तर माझं आयुष्यच संपलं’ हा अति-अवास्तविक विचार तयार झाला असेल तर अशा विचारांमुळे व्यक्ती तर्कशुद्धतेचा विसर पडून भावनांच्या आहारी जाते आणि क्रूर निर्णय घेते. अशा प्रकारच्या ‘irrational beliefs’ बदलण्याची आणि त्यावर समुपदेशनाच्या माध्यमातून काम करण्याची नितांत आवश्यकता आहे.

समीक्षा नरसिंगेच्या हत्येने समाजात लिव्ह-इन रिलेशनशिपवरील विश्वास, मानसिक आरोग्य, आणि भावनिक परिपक्वतेच्या प्रश्नांवर नव्याने चर्चा सुरू केली आहे. अशा घटना केवळ कायदेशीर नव्हे, तर मानसिक आणि सामाजिक पातळीवर व्यापक परिणाम घडवून आणतात. म्हणूनच नातेसंबंधांमध्ये संवाद, भावनिक समजूतदारपणा, आणि व्यक्तिगत निर्णयामध्ये स्वतंत्रतेसह जबाबदारी यांचा समतोल राखणे काळाची गरज बनली आहे.

——————————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments