Public Health and Family Welfare Minister and Guardian Minister of the district, Prakash Abitkar, on Saturday inspected the preparations for the circuit bench to be set up in the old court building opposite Chhatrapati Pramilaraje Hospital.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला १८ ऑगस्ट पासून सुरुवात होणार असून, यासाठी अंतिम टप्प्यातील तयारी जोमात सुरू आहे. १७ ऑगस्ट रोजी राज्य सरकारच्या वतीने भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शनिवारी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालया समोरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीत उभारण्यात येणाऱ्या सर्किट बेंचच्या तयारीची पाहणी केली. त्यांनी तिन्ही इमारतींना प्रत्यक्ष भेट देत, उभारण्यात येणाऱ्या तीन कोर्ट रूम्सची पाहणी केली आणि बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेतली.
येत्या १८ ऑगस्ट पासून कामकाजास सुरुवात होणार असल्याने इमारतींचा ताबा ११ ऑगस्ट पर्यंत न्यायालयाकडे देणे आवश्यक आहे. याबाबत पुढील तीन दिवसांत इमारत न्यायालयीन कामकाजासाठी हस्तांतरित करण्याचे नियोजन असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, “ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील व्यवस्था या सर्किट बेंचच्या माध्यमातून पुन्हा सुरू होत आहे. कोल्हापूरच्या इतिहासात लोकांना स्थानिक पातळीवर अनेक सुविधा देण्यात आल्या होत्या. सर्किट बेंच सुरू झाल्याने कोल्हापूरसह शेजारील पाच जिल्ह्यांतील नागरिकांना न्यायासाठी मुंबईला जाण्याची गरज राहणार नाही. ही आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.”
ते पुढे म्हणाले की, “१८ ऑगस्टला हा बेंच प्रत्यक्षात सुरू होताना कोल्हापूरसह परिसरातील पाचही जिल्ह्यांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जाईल.” या पाहणीवेळी न्याय विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते आणि स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते