कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाल येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संकेत सर्जेराव पाटील या तरुणाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मोठे यश मिळवत जगभरातील तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात चौथ्या वर्षात शिकणाऱ्या संकेतने आपल्या महाविद्यालयीन शिक्षणासोबत केलेल्या संशोधनातून ‘सिफ्रा एआय’ हे जगातील पहिले स्वयंचलित डेटा सायंटिस्ट टूल विकसित केले आहे. या प्रकल्पाला आता कॉपीराईट मान्यता मिळाली आहे.
डेटा विश्लेषण, व्हिज्युअलायझेशन आणि मशिन लर्निंग मॉडेल तयार करण्यासाठी लागणारे प्रोग्रामिंग व तांत्रिक कौशल्य या टूलमुळे संपुष्टात आले आहे. वापरकर्ते फक्त नैसर्गिक भाषेत ( मराठी किंवा इंग्रजी ) प्रश्न विचारून डेटा विश्लेषण, आलेख आणि भविष्यवाणी सहज मिळवू शकतात. विशेष म्हणजे हे टूल विद्यार्थ्यांपासून उद्योगजगतापर्यंत आणि संशोधकांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता
संकेतच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात दाद मिळाली आहे. ‘सिफ्रा एआय’चा संशोधन प्रबंध गुगलवर प्रकाशित झाला असून भारत सरकारने या प्रकल्पाला कॉपीराईट मान्यता दिली आहे. त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉनच्या स्टार्टअप फाऊंडर हब प्रोग्रामने या टूलला अधिकृत पाठिंबा दिला आहे. यामुळे ‘सिफ्रा एआय’ला जागतिक ओळख मिळाली आहे.
स्वतंत्र स्टार्टअपची स्वप्ने
संकेतने नोकरी करण्याऐवजी स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्याचा निर्धार केला असून ‘सिफ्रा एआय’ हे त्याचे पहिले पाऊल आहे. लवकरच हे टूल गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध होणार असून त्याद्वारे डेटा-आधारित निर्णय घेणे सामान्य लोकांसाठी सुलभ होईल.
हे टूल विविध क्षेत्रांतील लोकांसाठी अत्यंत उपयोगी ठरेल
-
विद्यार्थी : अभ्यासासाठी डेटा विश्लेषण सहज मिळवता येईल.
-
संशोधक : प्रगत मॉडेल तयार करून संशोधन कार्य सुलभ करता येईल.
-
उद्योजक : व्यवसायासाठी डेटावर आधारित निर्णय घेणे शक्य होईल.
-
शिक्षक : विद्यार्थ्यांना शिकवताना डेटा आधारित शिक्षण साधने वापरता येतील.
-
डेटा सायंटिस्ट व व्यावसायिक : वेळ व श्रम वाचवत अचूक विश्लेषण करता येईल.



