‘मुलांनो, बापाचे मालक होऊ नका’: परळी आगाराच्या वाहकाचा सल्ला सोशल मीडियावर व्हायरल

0
364
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क

प्रवासासाठी लेकरांनी दिलेले अवघे ५५ रुपये घेऊन निघालेली वयोवृद्ध व्यक्ती, बसमध्ये जेव्हा भाडेवाढ झाली आहे आणि तिकिटाला ६० रुपये लागतात असे कळल्यानंतर चेहऱ्यावरची हताशा लपविताना त्या व्यक्तीच्या डोळ्यात तराळलेले अश्रू एका वाहकाला अस्वस्थ करून गेले आणि त्याच अस्वस्थतेतून ‘तिकिटाचे पाच रुपये तशी फार मोठी गोष्ट नाही पण मुलांनो, बापाचे मालक कधी होऊ नका’ हा वाहकाने दिलेला सल्ला सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कुपोषित होत चाललेल्या समाजव्यवस्थेने आणि जर्जर झालेल्या कुटुंब व्यवस्थेने याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.


ही घटना आहे दोन दिवसापूर्वीची. परळी आगाराचे वाहक गणेश राडकर लातूर-परळी बसवर कर्तव्यास होते. दुपारी दोन वाजता लातूरहून बस परळीकडे निघाली. यावेळी गाडीत एक आजोबा येऊन बसले. गाडी काही अंतरावर गेल्यानंतर राडकर यांनी तिकीट काढायला सुरुवात केली. त्या आजोबांना तिकिटाचे पैसे मागितले, यावेळी त्यांनी हाफ तिकिटं सांगत ५५ रुपये हातावर टेकवले, आणखी ५ रुपये द्या असं राडकर त्यांना बोलले. तिकीट तर ५५ रुपये असताना ६० कसे असं त्या आजोबांनी विचारले. यावेळी त्यांना ‘बाबा तिकीट वाढल्याचे’ सांगितले. यावेळी त्यांनी खिशात हात घालून पाहणी केली पण पैसे नसल्याने त्यांनी ‘मुलाने एवढेच पैसे खर्चासाठी दिल्याचे सांगितले’ , हे सांगताना त्या आजोबांच्या नजरेत एक प्रकारची हताशा होती. ती हताश आणि चेहऱ्यावरची हतबलता , डोळ्यात तराळणारे पाणी वाहक राडकर यांना अस्वस्थ करून गेले. आणि त्यांनी या घटनेचा उल्लेख करून ‘खरं तर एवढ्या उन्हात प्रवास करताना तहान, भूक लागू शकते असं विचार न करता केवळ ५५ रुपये बापाच्या हातावर टेकवणाऱ्या मुलाचा विचार सतत मनात घोळत होता. तिकिटाचे पाच रुपये तशी फार मोठी गोष्ट नाही पण मुलांनो, बापाचे मालक होऊ नका कधी’ असा सल्ला देणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली.

गणेश राडकर यांनी लातूर-परळी बसमधील वयोवृद्ध आजोबांचा शेयर केलेला किस्सा आज अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

मनातली सल केली व्यक्त- आज आपण मोठे झालो.आपल्याकडे वडिलांनी व्यवहार दिला तर आपण बापालाच मोजके पैसे द्यावेत? ज्या बापाने लहानपणी सर्व लाड पुरवले, पैसे असोत नसोत मागेल तितके म्हणेल तेंव्हा पैसे पुरवले त्याच बापावर आज अशी वेळ… मोजून तिकीटा एवढेच पैसे …? सध्या उन्हाळा सुरु आहे, तहान लागू शकते अशा वेळेस त्यांनी काय करावे…कोणाला मागावे..? ५ रू माझ्यासाठी मोठी रक्कम नव्हती , मी ती भरली पण अशी परिस्थिती पाहून खूप वाईट वाटले. गाडी लातूरवरून परळीला आली पण माझ्या मनात ती गोष्ट सारखी सलत होती . म्हणूनच मित्रानो कोणीच बापाचे मालक होवू नका, त्यांना मागितल्यापेक्षा जास्त पैसे द्या अशी भावना मी सोशल मीडियावर व्यक्त केली.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here