मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्य सरकारच्या बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला यंदा एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्यावर्षी १८ जून २०२४ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेतून महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला असताना, आता मात्र राज्यातील अनेक महिलांना मोठा धक्का बसला आहे.
८० हजारांहून अधिक अर्ज रद्द
सरकारने नुकत्याच केलेल्या छाननीनंतर, ८० हजारांहून अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे या महिलांना पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. अर्ज रद्द होण्यामागे विविध कारणे सांगण्यात आली असून, आयकर विभागाच्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
जालना व नागपूर जिल्ह्यातील महिलांना मोठा फटका
या छाननीचा सर्वात मोठा फटका जालना आणि नागपूर जिल्ह्यातील महिलांना बसला आहे. या भागातील हजारो अर्ज अपात्र ठरले असून, यामुळे अनेक महिलांना पुढील आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. सरकारने नव्याने लागू केलेल्या निकषांनुसार, पात्रतेचे काटेकोर मूल्यांकन सुरू झाले आहे.
आयकर छाननीमुळे निर्णय
या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांची माहिती आयकर विभागाशी पडताळून पाहण्यात आली. त्यानुसार, अनेक महिलांनी कर भरला असल्याचे किंवा उत्पन्न मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. परिणामी, त्यांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे अनेक महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. योजनेचा लाभ सुरू असताना अचानक अर्ज रद्द होणे, यामुळे महिलांचे मोठे नुकसान झाले आहे. आता सरकारने स्पष्ट मार्गदर्शन करावे आणि अर्ज रद्द झालेल्या महिलांसाठी पुनर्पडताळणीची प्रक्रिया उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
———————————————————————————————



