नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
देशाच्या राजधानीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), नवी दिल्ली येथे पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास आणि संशोधन केंद्र सुरू करण्यात येत असून, येत्या २४ जुलै २०२५ रोजी या केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या ऐतिहासिक उपक्रमासोबतच ‘कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र’ देखील सुरू करण्यात येणार आहे.
शिवचरित्रावर संशोधनाची नवी दिशा
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीती, प्रशासन, हिंदवी स्वराज्य आणि मराठा साम्राज्याच्या सामरिक धोरणांवर शैक्षणिक संशोधन सुरू होणार आहे. यासाठी JNU च्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजने विशेष योजना तयार केली आहे.
या संशोधनात खालील तीन महत्त्वाचे विषय शिकवले जाणार आहेत
-
मराठा मिलिटरी हिस्ट्री
-
नौदल रणनीती
-
गोरिला युद्धनीती
या अभ्यासक्रमांत सुरक्षा रचना, सामरिक व्यूहरचना, आंतरराष्ट्रीय संदर्भातील युद्धतंत्र यांचाही समावेश राहणार आहे. यासाठी डिप्लोमा व पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत.
JNU तील नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
या अभ्यासक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी JNU मधील सेंटर ऑफ ईस्ट एशियन स्टडीजचे प्रा. अरविंद वेल्लारी आणि सेंटर ऑफ युरोपियन स्टडीजचे डॉ. जगन्नाथन हे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारकडून पाठबळ
या अभ्यासक्रमाच्या रचनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून आवश्यक शैक्षणिक आणि आर्थिक मदत मिळणार आहे. गेली १६ वर्षं रखडलेल्या या दोन अध्यासन केंद्रांना अखेर मूर्त स्वरूप मिळाल्याने मराठी भाषा, शिवचरित्र आणि सामरिक अभ्यास क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे.
शिवाजी महाराजांनी प्रस्थापित केलेले ‘ हिंदवी स्वराज्य ’, त्यांचा प्रशासन तंत्र, धर्मनिरपेक्षता आणि लोकहितवादी दृष्टिकोन, तसेच सामरिक कसब याचा अभ्यास अखंड भारताच्या ऐतिहासिक संदर्भात केला जाणार आहे. यातून छात्र, संशोधक व धोरणकर्त्यांना नव्या दृष्टीकोनाची दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे. ही घडामोड महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
———————————————————————————————–