spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeकलाचॅट अँड सॉंग्ज विथ बँड ब्रोस : कोल्हापुरातील नवीन कॅफे अँड म्युझिक...

चॅट अँड सॉंग्ज विथ बँड ब्रोस : कोल्हापुरातील नवीन कॅफे अँड म्युझिक ट्रेंड

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले
कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले
कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात
स्वप्नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत
कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट
हुंकारला नदीकाठ कधी हरवली वाट
वार्‍यापावसाची गाज काळी भासतच दाट
कधी धुसर धुसर एक वादळाची वाट….
या मालिका शीर्षक गीता बरोबर… मनमंदिरा..ओ रे पिया…साँसों की माला …अशा फ्युजन’ आणि ‘फ्लिप’ मधील गाण्यांनी शुक्रवारची संध्याकाळ मंत्रमुग्ध झाली. निमित्त होते ‘चला ऐकूया’ या कार्यक्रमाचे. ‘प्रसारमाध्यम’ कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात ‘बँड ब्रोस’ या संगीत पथकातील तीन संगीतप्रेमी तरुणांनी हजेरी लावली आणि संध्याकाळचा नूरच बदलला. एकापेक्षा एक विविध प्रकारची गाणी सादर करत उपस्थित रसिकांना खिळवून ठेवले. भारतीय व पाश्चात्य संगीतातील शैलीचा अफलातून संगम त्यांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांना भारावून टाकणारा ठरला. 
कोल्हापूरच्या मातीला अनेक प्रतिभावान कलाकार लाभले आहेत, आणि त्यात आता अजून एक नवं नाव झळकतंय ते म्हणजे ‘बँड ब्रोस’. तीन संगीतप्रेमी तरुण योगी हर्डीकर, वेदांत कुसुरकर आणि सोहन कांबळे यांच्या कल्पकतेतून जन्मलेलं हे पथक पारंपरिकतेच्या चौकटी मोडून संगीताच्या नव्या वाटा शोधत आहे. कोणतंही औपचारिक संगीत शिक्षण नसतानाही या तरुणांनी ‘फ्युजन’ आणि ‘फ्लिप’ या आधुनिक शैलींचा अफलातून संगम साधत नवीन कॅफे अँड म्युझिक ट्रेंड उदयास आणला आहे. संगीताला एक नव्यानं आकार दिला आहे. त्यांच्या प्रयोगशीलतेतून निर्माण होणारी संगीताची ही आगळी वेगळी दुनिया रसिकांना नवचैतन्याचा अनुभव देणारी ठरत आहे. ‘बँड ब्रोस’ हे फक्त एक पथक नाही, तर नव्या युगातल्या संगीताचा एक स्फूर्तीदायक प्रवाह आहे.
‘प्रसारमाध्यम’ कार्यालयात आयोजित ‘चला ऐकूया’ या कार्यक्रमासाठी उपस्थित ‘बँड ब्रोस’ चे योगी, वेदांत व सोहन यांचे ऋषीराज प्रताप पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

अगदी शास्त्रीय संगीतापासून ते नाट्य संगीत आणि चित्रपट संगीतापर्यंत कोल्हापूरने संगीत क्षेत्रात योगदान दिले आहे. याच परंपरेत तीन तरूणांनी संगीताची एक अनोखी धाटणी नावारूपाला आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. ‘बँड ब्रोस’ या आपल्या संगीत पथकाच्या माध्यमातून ‘फ्युजन’ आणि ‘फ्लिप’ असे नवे प्रयोग संगीत क्षेत्रात विकसित केले आहेत. या त्यांच्या प्रयोगाला रसिकांमधून चांगलीच दाद मिळत आहे.

तीन संगीत वेडे तरुण संगीत क्षेत्रात काहीतरी वेगळं करण्याच्या प्रेरणेने पछाडलेले आहेत. ‘बँड ब्रोस’ या आपल्या संगीत पथकाच्या माध्यमातून संगीताची एक अनोखी धाटणी विकसित केली आहे.  योगी, वेदांत आणि सोहन या तिघांची मुळात संगीताची पार्श्वभूमीच नाही, आहे ती फक्त संगीताबद्दलची श्रद्धा आणि या क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याची उमेद. याच उमेदीतून सहा महिन्यांपासून हे तिघे तरुण एकत्र आले आणि ‘बँड ब्रोस’ या आपल्या संगीत पथकाची स्थापना केली. पारंपारिक संगीताला थोडा फाटा देऊन संगीत प्रेमींना संगीतातील अनोखा ‘जॉनर’ म्हणजेच धाटणी निर्माण केली आहे. ‘फ्युजन’ आणि ‘फ्लिप’ या अनोख्या पद्धतीचा खूप चांगल्या प्रकारे वापर करून संगीत श्रवणीय बनवतात. 

चला ऐकूया साठी उपस्थित रसिक प्रेक्षक…

 ‘बँड ब्रोस’ च्या पहिल्या कार्यक्रमाला तीस लोक उपस्थित होते. त्यातून त्यांनी आपल्या गाण्यांच्या पध्दती व नवनव्या चालींंनी रंगत वाढवत नेली आणि देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात जवळपास पाचशे लोकांच्या उपस्थितीत सलग तीन दिवस यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन केले. ३१ डिसेंबर ला त्यांनी एका दिवसात सहा प्रयोग करत त्यांनी एक अनोखा विक्रम केला. त्यांची निर्मिती असलेली दोन गाणी आता प्रदर्शित झाली असून अजून चार गाणी येत्या काही दिवसांत रसिकांच्या समोर येत आहेत.

यावेळी बोलताना योगी हर्डिकर यांनी सांगितले की, आम्ही ‘बँड ब्रोस’ च्या माध्यमातून कोल्हापूरचे नाव आम्हाला मोठं करायचं आहे. आमचा बॅड हा गाण्यांच्या माध्यमातून निर्माण झाला असून प्रत्येकाची शिक्षणाची पार्श्वभूमी वेगळी असली तरी आम्ही भारतीय संगीतातील सुरांना विविध चालींत बांधण्याच्या प्रयत्न करत आहोत. आम्हाला कोल्हापूरचे प्रेम मिळत असून इथून पुढे मोठ्या प्रमाणात शो करायचे आहेत. त्यासाठी रसिकांचे प्रेम अपेक्षित आहे.  

संगीतातील आशा या प्रयोगाला संगीत रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि संगीत क्षेत्रातील कोल्हापूरची कामगिरी उंचावण्यासाठी ‘बँड ब्रोस’ पथक भरपूर परिश्रम घेत आहे. बँड स्थापन झाल्यापासून ‘बँड ब्रोज’ने धिक ‘फ्युजन’ आणि ‘फ्लिप’ या प्रकारातील २०० हून अधिक प्रयोग सादर केले आहेत. सध्या त्यांना कोल्हापूर बरोबर पुणे आणि मुंबई इथून सुद्धा हे प्रयोग सादर करण्यासाठी बोलावण्यात येत आहे. 

संगीत फ्युजन म्हणजे काय ?

संगीत फ्युजन म्हणजे दोन किंवा अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या संगीतप्रकारांचे मिश्रण करून एक नवीन, सर्जनशील संगीतप्रकार निर्माण करणे होय. फ्युजन संगीत हे पारंपरिकतेची सखोलता आणि आधुनिकतेचा स्पर्श एकत्र आणणारे एक सृजनशील माध्यम आहे. त्यामुळे त्यात नवीनतेचा आनंद, सांस्कृतिक आदानप्रदान, आणि संगीताचा उत्क्रांतीशील प्रवास यांचा मिलाफ असतो.

फ्लिप सॉंग किंवा संगीतातील फ्लिप हा प्रकार तुलनेने नवीन संगीत प्रयोगांतील एक संज्ञा आहे जो आधुनिक संगीत निर्मिती, विशेषतः हिप-हॉप आणि पॉप या शैलींमध्ये आढळतो. फ्लिप म्हणजे मूळ गाण्याचा सर्जनशीलपणे पुन्हा वापर किंवा त्याची एक वेगळी आवृत्ती तयार करणे. मूळ गाण्याचा काही भाग वापरून त्याचे टेम्पो, ताल स्केल किंवा मूड बदलले जातात. गाण्याला नवीन ओळख, साऊंड किंवा भावना दिली जाते.

—————————————————————————————–

 

 

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments