कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी गट-गणांच्या प्रारूप आराखड्यावरील हरकतींचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. एकूण १४१ हरकतींपैकी आठ हरकती दुबार निघाल्याने १३२ हरकतींवर अंतिम निर्णय देण्यात आला. त्यापैकी फक्त ८ हरकती (सुमारे ६ टक्के) मान्य करण्यात आल्या असून १२४ हरकती (९४ टक्के) फेटाळण्यात आल्या.
या सुनावण्या ५ ऑगस्ट रोजी पुण्यातील विधान भवनात पार पडल्या. जिल्हा परिषदेसाठी १२८ आणि पंचायत समितीसाठी १३, अशा एकूण १४१ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यात हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक ६८, तर करवीर तालुक्यात ३९ हरकती होत्या. तहसीलदारांचा अभिप्राय आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल घेतल्यानंतर विभागीय आयुक्तांनी निकाल दिला. निकालाची माहिती प्रत्येक तहसीलदार कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे.
आपण दखल केलेल्या हरकतीवर बदल होईल असा विचार करत अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र कागल ५ आणि चंदगडमधील ३ इतक्याच हरकती मंजूर झाल्या आहेत. हातकणंगले तालुक्यातून सवार्धिक अशा ७० तक्रारी दखल झाल्या होत्या. तर करवीरमधून ३९ तक्रारी दखल झाल्या होत्या.
सर्व हरकतींदारांची आयुक्तासमोर सुनावणी घेऊन लेखी म्हणणेही घेण्यात आले होते. करवीर तालुक्यातील ३९ सह उर्वरित १२४ हरकती विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी फेटाळल्या आहेत. २२ ऑगस्टला अंतिम प्रभाग आराखडा जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, ज्यांच्या हरकती फेटाळल्या आहेत, त्यांना न्यायालयात दाद मागता येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या पाडळी खुर्द, शिंगणापूर, निगवे खालसा, सडोली खालसा यासह इतर प्रभागांमधील गावांमध्ये संलग्नता नाही. या गावामधून नद्यांचा प्रवाह जातो. त्यामुळे पुरादरम्यान एकमेकांशी संपर्क राहण्यास अडचण येते. याशिवाय, कोल्हापूर दक्षिण मतदार संघातही अनेक गावांमध्ये संबंध किंवा संपर्क नसतानाही प्रभाग रचनेत घेतलेली गावांमध्ये बदल करावा, अशी हरकत घेतली होती. मात्र, या सर्व हरकती फेटाळल्या आहेत.
कागल तालुक्यातील ५ हरकती मान्य करण्यात आल्या, तर चंदगड तालुक्यातील २ हरकती पूर्णतः आणि १ हरकत अंशतः मान्य करण्यात आली. यामुळे कागल आणि चंदगडमधील एकूण ८ जिल्हा परिषद गटांमध्ये बदल होणार आहेत.
मुख्य बदल :
-
नव्याने तयार केलेला बाणगे ( ता. कागल ) जिल्हा परिषद गट रद्द करण्यात आला असून त्याला म्हाकवे जिल्हा परिषद मतदारसंघ असे नाव देण्यात आले आहे.
-
म्हाकवे गाव सिद्धनेर्ली मतदारसंघातून बाहेर पडून साके पंचायत समिती मतदारसंघात समाविष्ट झाले आहे.
-
बाणगे गटातील पिंपळगाव बुद्रुक व कसबा सांगाव गटातील शंकरवाडी गावे मौजे सांगाव पंचायत समितीऐवजी सिद्धनेर्ली पंचायत समिती गणात हलवण्यात आली आहेत.
-
हल्लारवाडी (ता. चंदगड) गावाचा समावेश माणगावऐवजी तुडये जिल्हा परिषद मतदारसंघात करण्यात आला आहे.



