शाहूवाडी : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. परिणामी, रविवारी (२७ जुलै) सायंकाळी जलसंपदा विभागाने धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नदीने रौद्ररूप धारण केले असून, परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ४ वाजल्यापासून वक्र दरवाजांमधून होणारा विसर्ग ११,९०० क्युसेकवरून वाढवून १३,४४५ क्युसेक करण्यात आला आहे. तसेच वीजगृहातूनही १,६३० क्युसेक पाणी सोडण्यात येत असून, सध्या एकूण १५,०७५ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.
शाहूवाडी व शिराळा तालुक्यांमध्ये मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. परिणामी, वारणा नदीत पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. धरणाची सुरक्षितता आणि पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी विसर्ग वाढवण्याची गरज भासल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.
नदीने धोकादायक पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक गावांचा संपर्क रस्ते व दळणवळणाचे माध्यम खंडित झाल्याने तुटला आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन स्थानिक यंत्रणांकडून करण्यात आले आहे.
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
—————————————————————————————