चंदगड प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
चंदगड पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासनाने निवासस्थाने बांधली आहेत. मात्र पोलीस स्टेशन आणि निवासस्थान यामधील अंतर खूप असल्यामुळे आणि शाळा, बाजारपेठ लांब पडत असल्याने पोलीस कर्मचारी निवासस्थानाकडे फिरकत सुद्धा नाहीत. यामुळे हे पोलीस निवास वापराविना पडून आहे.
चंदगड पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बऱ्याच वर्षांपूर्वी पोलीस निवास बांधण्यात आली होती. पोलीस ठाणे आणि पोलीस निवास यात अंतर खूप असल्यामुळे पोलीस कर्मचारी चंदगड शहरातच राहणे पसंत करतात. शहरात मुलांसाठी शाळा, महाविध्यालय आणि इतर आवश्यक बाबी सहज उपलब्ध होतात त्यामुळे शहराबाहेर असणारे पोलीस निवास गैरसोयीचं ठरते. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी या पोलीस निवासस्थानाकडे पाठ फिरवली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे पोलीस निवासस्थान वापराविना पडून असल्याने बऱ्याच समस्येंच्या गर्तेत अडकले आहे.
पोलीस निवासस्थानाच्या इमारतीवर झाडझुडपांचे साम्राज्य पसरल्यामुळे ही इमारत अक्षरशः एका पडीक खंडरासारखी दिसत आहे. शासनाचे लाखों रुपये वापराविना पडून आहेत. पोलीस कर्मचारी येथे वास्तव्यास येणार नसतील तर या ठिकाणची दुरुस्ती करून अथवा नवीन इमारत बांधून इतर कोणत्याही शासकीय कार्यालयाला वापरण्यासाठी द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.




