कोल्हापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
कोल्हापुरात आज सकाळ पासून ढगाळ हवामान आहे. सकाळी ११ च्या दरम्यान झिरमाट पाऊस झाला. दुपारी सूर्याने तोंड दाखविले. याचबरोबर हवेमध्ये उष्माही वाढत होता. भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविला आहे. विशेषत: घाटमाथ्याकडील तालुक्यात पाऊस पडण्याची जास्त शक्यता वर्तविली आहे.
हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात कोकणातील उत्तरेकडे असणाऱ्या काही भागांमध्ये पावसाच्या सरींचा जोर वाढणार आहे. तर, वाऱ्याचा वेग वाढून ताशी ३० ते ४० किमी वर पोहोचून उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्याच्या घाटमाथ्यावरील भागांमध्येसुद्धा पावसाची जोरदार हजेरी असेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
जोरदार वाऱ्यांसह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह राज्यात मराठवाडा भागातसुद्धा पावसाची जोरदार हजेरी असेल असा अंदाज वर्तवत हवामान विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे.
हवामान विभागानं पूर्व विदर्भालाही जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून, सध्याच्या घडीला गुजरातचा उत्तरेकडील भाग आणि राजस्थानच्या नैऋत्येकडील कमी दाबाच्या प्रणालीमुळं राज्याच्या पर्जन्यमानावर परिणाम होत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्या कारणानं आणि तिथं निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळं मराठवाडा आणि विदर्भासह कोकणावर पावसाची वक्रदृष्टी असल्याचं पाहायला मिळेल.