कोल्हापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
यंदाच्या वर्षी मान्सूनने अपेक्षेपेक्षा लवकर दाखल होत महाराष्ट्रात दमदार सुरुवात केली होती. जुलैच्या मध्यावर काहीसा खंड पडला असला, तरी पुन्हा पावसाने जोर धरला. आता ऑगस्टच्या सुरुवातीलाच हवामान खात्यानं राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि खानदेशात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत देखील ढगाळ वातावरण आणि मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहण्याची चिन्हं आहेत.
धरण परिसरात पावसामुळे विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं, असं प्रशासनाकडून सूचित करण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, कासारी, तुळशी, वारणा, दूधगंगा अशा धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढतो आहे.
विदर्भात यलो अलर्ट, विजांसह पावसाचा इशारा
विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागानं या भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
गोंदिया जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे मोठं नुकसान
जुलैमध्ये दोन वेळा पूरस्थिती निर्माण झाली होती. या काळात ५ जणांचा मृत्यू, १५ जनावरांचा मृत्यू, ७२० घरांचे नुकसान आणि २५० गोठ्यांचं नुकसान झालं. गोंदियातील इटियाडो (९८ %), शिरपूर ( ७० %), कालीसराळ ( ६८%), पुजारी टोला (६७%) या धरणांमध्ये चांगला पाणीसाठा नोंदवला जात आहे.
मुंबईत समाधानकारक पावसाचा अभाव
मुंबईत जुलैमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला. कुलाबा केंद्रात ३७८.४ मिमी आणि सांताक्रूझ केंद्रात ७९०.६ मिमी पावसाची नोंद झाली. हे गतवर्षीच्या तुलनेत लक्षणीय घट आहे. जुलैच्या सुरुवातीला पाऊस कमी होता; २० जुलैनंतर पावसाने काहीशी भरपाई केली, पण एकूण सरासरीच्या तुलनेत तो कमीच ठरला.
पुण्यात धरण पाणीसाठा समाधानकारक
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात सध्या २५.६४ टीएमसी म्हणजे ८७.९७ % पाणीसाठा आहे. मागील वर्षी याचवेळी हा साठा २६.४६ टीएमसी म्हणजे ९०.७६ % होता. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
राज्यभरात पुन्हा मान्सून सक्रिय होत असून, विदर्भात विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा यलो अलर्ट आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि मुंबई परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. धरणांमध्ये पाणी साठा वाढत असल्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करावं, असं प्रशासनाचं आवाहन आहे.
—————————————————————————————-






